Beed News : सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या
Beed Child Marriage : बीड जिल्ह्यात बालविवाहाचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासन सतर्क असल्याने अनेकदा इतर जिल्ह्यात जाऊन बालविवाह लावण्याचे प्रकार समोर येत आहेत.

Beed Child Marriage : बीड जिल्हा (Beed News) हा ऊसतोड कामगारांचा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने ऊसतोड मजूर जिल्ह्यातून स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचा शिक्षण आणि निवासाचा प्रश्न उद्भवतो. परिणामी 15 ते 16 व्या वयातच मुलींचे बालविवाह लावून दिले जातात. गतवर्षभरात 256 तर मागील सहा महिन्यात 30 बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलं. यात आनंदाची बाब म्हणजे यातील 28 मुलींचा बालविवाह (Child marriage) रोखल्यानंतर त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 70 ते 89 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.
लग्नासाठी मांडव देखील उभारला, अन्...
एका मुलीचा वयाच्या पंधराव्या वर्षी बालविवाह लावला जात होता. तिचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. त्यांच्या गावात शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे मुलीचे लग्न लावून देणे आई-वडिलांना सोपे वाटले होते. यासाठी लग्नाची तयारी झाली. लग्नासाठी मांडव देखील उभारण्यात आला होता. ही बाब चाईल्ड लाईन आणि बालकल्याण समितीला कळताच हा बालविवाह रोखण्यात आला. बालविवाह रोखल्यानंतर या मुलीने दहावीची परीक्षा दिली. यात मुलीने 70 टक्के गुण मिळवले आहेत. यशाला गवसणी घातल्यानंतर तिने बालकल्याण समितीचे कार्यालय गाठले. दहावीची परीक्षा दिल्यानंतर पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न त्या मुलीचे आहे.
बालविवाह लावून देण्याची चूक वडिलांनी केली मान्य
तर अशीच परिस्थिती बीड मधील मजुरी करणाऱ्या कुटुंबाची देखील आहे. मुलीने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मजुरी करणाऱ्या वडिलांनी या मुलीचे लग्न करायचे ठरविले. यासाठी लग्नाची तयारी पूर्ण झाली. मात्र शहरातच बालविवाह केला जात असल्याने प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे प्रशासनाने हा बालविवाह रोखला. प्रशासनाकडून आई-वडिलांची समजूत काढून समुपदेशन करण्यात आलं. यानंतर आई-वडिलांनी मुलीचा सांभाळ करत मुलीला बारावीचे ऍडमिशन करून दिले. घरची परिस्थिती खाजगी क्लासेस लावण्याची नव्हती. त्यामुळे या मुलीने घरीच अभ्यास करून बारावीत 75 टक्के गुण मिळवले. मुलीचा बालविवाह लावून देत असल्याची चूक वडिलांनी देखील मान्य केली. परंतु, आता मुलीला चांगलं शिक्षण देण्याचं स्वप्न कुटुंब पाहत आहे.
प्रशासनासमोर बालविवाह रोखण्याचे आजही आव्हान
दरम्यान, बीड जिल्ह्यात बालविवाहाचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासन सतर्क असल्याने अनेकदा इतर जिल्ह्यात जाऊन बालविवाह लावण्याचे प्रकार समोर येत आहेत. मात्र, जे बालविवाह रोखण्यात आले. त्यातील मुलींनी यश संपादन केल्यानंतर बालकल्याण समितीने समाधान व्यक्त केले आहे. परंतु आजही जिल्ह्यात बालविवाह रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
शिक्षणाचे महत्व पटवून देणे गरजेचे
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालविवाहाची जनजागृती आणि शिक्षणाचे महत्व पटवून देणे प्रशासनाकडून गरजेचे आहे. तसेच ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांच्या मुलींसाठी शिक्षणाकरिता ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून पालकांना या मुली डोईजड जाणार नाहीत. या मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊन भविष्यात स्वावलंबी बनतील, असे बाल कल्याण समितीच्या सदस्य छाया गडगे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
























