Honda लवकरच घेऊन येत आहे नवीन कॉम्पॅक्ट SUV, मारुती ब्रेझा आणि Hyundai Venue ला देणार टक्कर
Honda Upcoming Suv: देशात एसयूव्ही कारची मोठी क्रेझ वाढली आहे. अशातच दिग्गज वाहन उत्पादक कंपनी होंडा आपली नवीन एसयूव्ही लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे.
Honda Upcoming Suv: देशात एसयूव्ही कारची मोठी क्रेझ वाढली आहे. अशातच दिग्गज वाहन उत्पादक कंपनी होंडा आपली नवीन एसयूव्ही लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. कंपनीने आपल्या एसयूव्ही लाइनअपमध्ये बर्याच काळापासून कोणतेही नवीन मॉडेल लॉन्च केलेले नाही. अशा परिस्थितीत कंपनी एसयूव्ही मार्केटमधील स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडली आहे. मात्र आता कंपनी लवकरच एक नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे.
कंपनीने नुकतीच इंडोनेशियन मार्केटमध्ये नवीन SUV लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या SUV चा टीझर देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये कंपनीने या कारचे नाव RS असे ठेवले आहे. एका रिपोर्टनुसार, ही होंडा कॉन्सेप्ट कार जे WR-V चे अपडेटेड मॉडेल असू शकते. कंपनीने काही महिन्यांपूर्वी या कारचे डिझाइन देखील उघड केले आहे. त्यानुसार या कारला स्लिम एलईडी हेडलाइट, एलईडी फॉग लॅम्प आणि मोठा फ्रंट बंपर देण्यात आला आहे. ही SUV उभ्या टेल लाइट्ससह येते आणि तिच्या ORVM वर टर्न इंडिकेटर देखील दिलेले आहेत. होंडाच्या नव्या एसयूव्हीमध्ये रूफ रेलही देण्यात आली आहे. होंडा ही एसयूव्ही आपल्या सेन्सिंग तंत्रज्ञानासह सादर करणार आहे.
रिपोर्टनुसार, Honda ही SUV सर्वात आधी दक्षिण पूर्व आशियातील बाजारपेठांमध्ये लॉन्च करणार आहे. मात्र ही Honda SUV भारतातही लॉन्च होईल, अशी आशा कमी आहे. सध्या Honda भारतात WR-V सब-कॉम्पॅक्ट SUV ऑफर करत आहे. Honda ची नवीन SUV भारतात लॉन्च झाली, तर ती मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किया सॉनेट आणि निसान मॅग्नाइटशी स्पर्धा करेल.
दरम्यान, Honda ने अद्याप भारतातील mid-size SUV बाजारात प्रवेश केलेला नाही. आत्तापर्यंत कंपनी भारतासाठी नवीन मध्यम आकाराच्या SUV वर काम करत आहे. जी 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी सध्या Amaze, City, City E: HEV (हायब्रिड) आणि WRV ची विक्री करते. होंडाने आपला ग्रेटर नोएडा प्लांट 2020 मध्ये बंद केला. ज्यामुळे कंपनीला सिविक आणि CR-V सारख्या प्रीमियम मॉडेल्सचे उत्पादन थांबवावे लागले. आता कंपनी अमेझ, सिटी, जॅझ आणि डब्लूआर-व्ही ची निर्मिती आपल्या तपुकारा (राजस्थान) प्लांटमध्ये करत आहे.
कंपनी आपल्या इलेक्ट्रिक प्रोजेक्टचा भाग म्हणून भारतातील काही मॉडेल्स बंद करण्याचा विचार करत आहे. यामध्ये सिटी होंडाचे फोर्थ जनरेशन मॉडेल आणि WR-V आणि Jazz सारख्या कारचा समावेश असू शकतो. 2030 पर्यंत 30 इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. या काळात होंडा जगभरात 20 लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करेल. होंडा सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात Honda One EV आणि Honda-E सारख्या इलेक्ट्रिक कारची विक्री करत आहे.