Car Recall : 'या' पाच कंपन्या 23 हजारांहून अधिक कार परत मागवणार, काय आहे कारण?
Car Recall : ऑटोमोबाईल कंपनी पोर्श कोरिया, होंडा कोरिया आणि इतर तीन ऑटो कंपन्या 23 हजारांहून अधिक गाड्या परत मागवणार आहेत.
Car Recall : ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) पोर्श कोरिया, होंडा कोरिया आणि इतर तीन ऑटो कंपन्या 23 हजारांहून अधिक गाड्या परत मागवणार (Recall Policy) आहेत. गाड्यांमध्ये दोष आढळल्यामुळे दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे, परिवहन मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मर्सिडीज-बेंझ कोरिया, फोर्ड सेल्स अँड सर्व्हिस कोरिया आणि बाईक कोरियासह पाच कंपन्या त्यांच्या 11 वेगवेगळ्या मॉडेल्सच्या एकूण 23 हजार 986 युनिट्स परत मागवणार आहेत.
अनेकदा ऑटोमोबाईल कंपन्यांनी विक्री केलेल्या वाहनांमध्ये दोष आढळतात. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर बऱ्याच कंपन्या या कार परत मागवतात. याला कार रिकॉल असंही म्हणतात. वाहनांमधील दोषामुळे आपली विश्वासार्हता गमावू नये आणि ग्राहक टिकून राहावेत यासाठी कंपन्यांकडून दोष असलेल्या गाड्यांची दुरुस्ती केली जाते. अशावेळी केवळ एक दोन नाही तर त्या बॅचमध्ये एकाच वेळी तयार झालेल्या हजारो गाड्या परत मागवल्या जातात.
वाहनं रिकॉल करण्यामागील कारणं (Car Recalling Reason)
जेव्हा वाहनांच्या काही पार्ट्समध्ये दोष असल्याच्या तक्रारी येतात, तेव्हा ऑटोमोबाईल कंपन्या वाहनं रिकॉल करतात. हा दोष एक-दोन युनिट्सपर्यंत मर्यादित न राहता हजारो युनिट्समध्ये पाहायला मिळतो. हीच बाब लक्षात घेऊन यावेळी निर्मिती केलेली वाहनं कंपनीकडून परत मागवल्या जातात. या पाच ऑटोमोबाईल कंपन्यांच्या कार परत मागवण्याचे कारण म्हणजे वाहनांमध्ये आढळलेले काही दोष. उदाहरणार्थ, पोर्श केयेन SUV ही कार त्याच्या डॅशबोर्डसह सॉफ्टवेअर समस्येमुळे परत मागवली जाणार आहे. Honda Accord गॅसोलीन हायब्रीड सुरक्षा बेल्टच्या दोषासाठी आणि Mercedes-Benz AMG G63 SUV त्याच्या फ्रंट ब्रेक सिस्टममधील दोषासाठी परत मागवली जाणार आहे.
परत मागवलेली वाहनं मोफत दुरुस्त होणार
ही रिकॉल पॉलिसी फ्री ऑफ कॉस्ट असते, म्हणजेच त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. त्यासाठी वाहन मालकांना कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटर्सला भेट द्यावी लागते. परिवहन मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, वाहन मालक त्यांच्या वाहनांमध्ये आढळलेल्या दोषांची दुरुस्ती करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटरना भेट देऊ शकतात, ज्यासाठी कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे या रिकॉल पॉलिसीमध्ये तुमची तर गाडी नाही ना? याची एकदा नक्की खातरजमा करुन घ्या.
हेही वाचा