Over Speed Challan : आता ओव्हरस्पीडसाठी दंड बसणार नाही; गुगलचे 'हे' फीचर ठरेल फायदेशीर
Challan for Overspeed Google Maps : रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्यास मदत करण्यासाठी, Google Maps ने अलीकडेच एक नवीन फीचर लाँच केले आहे.
Google Map Real Time Speed Limit Feature : अनेकदा वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्याबद्दल अनेकांना दंड भरावा लागला आहे. मात्र, गुगलच्या एका फीचरमुळे वाहनचालक दंडात्मक कारवाईपासून वाचू शकता. रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्यास मदत करण्यासाठी, Google Maps ने अलीकडेच एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे जागतिक पातळीवर रस्त्यांवरील रिअल-टाइम वेग मर्यादेची माहिती दर्शवेल. ड्रायव्हर्सना वेग आणि इतर संबंधित माहिती देणे असे या फीचरचे उद्दिष्ट आहे. हवामानामुळे कमी दृश्यमानता किंवा वेगवेगळ्या भागात अज्ञात रहदारी नियमांबाबत हे फीचर मदतशीर ठरेल असे म्हटले जात आहे.
हे फीचर फायदेशीर का आहे?
हायवेवरून स्थानिक रोडवर जाताना चालकांना वेगमर्यादा लवकर कळत नाही, त्यामुळे नकळत वेगाने गाडी चालवल्याबद्दल त्यांना दंड ठोठावला जातो. विशेषत: रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात रस्त्यांवरील सूचना फलक दिसत नाहीत, त्यामुळे रस्त्याच्या योग्य वेगमर्यादेची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे, वाहन चालकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना उत्तम सुरक्षितता, नेव्हिगेशन सहाय्य देण्यासाठी, Google Maps ने स्पीडोमीटर फीचर लाँच केले आहे. हे जगभरातील रस्त्यांसाठी रिअल-टाइम वेग मर्यादा माहिती प्रदान करेल. ही सुविधा सध्या फक्त अँड्रॉईड फोनवर उपलब्ध आहे.
Google Map मध्ये स्पीडोमीटर कसे अॅक्टीव्ह करावे
1. सर्वप्रथम, तुमच्या Android डिव्हाइसवर Google Map अॅप उघडा.
2. Google मॅप अॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे असलेल्या ठिकाणी टॅप करा.
3. ड्रॉप-डाउन मेनूमध्ये, "सेटिंग्ज" निवडा. हे सेटिंग मेनू उघडेल. तेथून, पुढे जाण्यासाठी "नेव्हिगेशन सेटिंग्ज" निवडा.
4. एकदा तुम्ही नेव्हिगेशन सेटिंग्जमध्ये आल्यावर, "ड्रायव्हिंग पर्याय" असे लेबल असलेला सेक्शन शोधा. येथे तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग अनुभवाशी संबंधित विविध सुविधा मिळतील.
5. "ड्रायव्हिंग पर्याय" अंतर्गत, तुम्हाला स्पीडोमीटरसाठी टॉगल स्विच मिळेल. स्पीडोमीटर Enble / अॅक्टीव्ह करण्यासाठी आणि तुमच्या ड्रायव्हिंगच्या गतीबद्दल रिअल-टाइम माहिती मिळवण्यासाठी, स्विच चालू करा.
एकदा तुम्ही स्पीडोमीटर सेट केल्यावर, ते Google मॅपसह नेव्हिगेट करताना तुमचा GPS वेग दर्शवेल आणि जर तुम्ही वेग मर्यादा ओलांडत असाल तर त्याचा रंग बदलून तुम्हाला अलर्ट करेल.
स्पीडोमीटर कसे काम करते?
वृत्तानुसार, Google मॅपचे स्पीडोमीटर स्ट्रीट व्यू इमेजरी आणि थर्ड-पार्टी इमेजरी मधून वेग मर्यादा ओळखण्यासाठी AI चा वापर करून वेग नियंत्रित करण्यात मदत करते. या एआय मॉडेलला जगभरातील शेकडो प्रकारच्या चिन्हांवर प्रशिक्षित केले गेले आहे जेणेकरून चिन्हे भिन्न दिसत असली तरीही ते वेग मर्यादा ओळखू शकेल. एकदा AI मॉडेलने चिन्ह ओळखले की, ते युजर्सला गती मर्यादेसह अद्यतनित करण्यासाठी त्याच्या अचूक भौगोलिक ठिकाणाशी जुळण्यासाठी प्रतिमेतील GPS माहिती वापरते.