EV कारच्या चार्जिंगची चिंताच मिटली! 21 मिनिटांत 80 टक्के चार्ज; Hyundai चे या 11 शहरांत Ultra-Fast EV चार्जिंग स्टेशन्स
Hyundai Motor India : Hyundai ने सुरु केलेल्या 11 अल्ट्रा-फास्ट ईव्ही चार्जर्सपैकी 6 नवीन चार्जिंग स्टेशन मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, गुरुग्राम आणि बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत.
Hyundai Motor India : दिग्गज कार निर्माता कंपनी ह्युंदाई मोटरने (Hyundai Motor India) देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) अधिक सुलभ बनविण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या अल्ट्रा-फास्ट ईव्ही चार्जिंग नेटवर्कचा (Ultra Fast EV Charging Network) विस्तार आणखी मोठा केला आहे. त्यानुसार, विविध शहरांमध्ये आणि प्रमुख महामार्गांवर 11 नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत. आता यामध्ये कोणकोणत्या स्थानकांवर हे ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध आहेत तसेच यामध्ये आणखी कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
चार्जर कोणत्या ठिकाणी बसवले आहेत?
Hyundai Motor India ने सुरु केलेल्या 11 अल्ट्रा-फास्ट ईव्ही चार्जर्सपैकी 6 नवीन चार्जिंग स्टेशन मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, गुरुग्राम आणि बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहेत. इतर पाच चार्जिंग स्टेशन्स दिल्ली-चंदीगड, दिल्ली-जयपूर, हैदराबाद-विजयवाडा, मुंबई-सुरत आणि मुंबई-नाशिक या प्रमुख महामार्गांवर उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
EV काही मिनिटांत चार्ज होईल
ही अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशन्स ग्राहकांना त्यांची वाहने जलद आणि कार्यक्षमतेने चार्ज करण्यास अनुमती देतात. उदाहरणार्थ, Hyundai IONIQ 5, Hyundai च्या इलेक्ट्रिक वाहन मॉडेलपैकी एक, हे चार्जर वापरून फक्त 21 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज केले जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेली ही सुविधा आणखी चांगली ठरणार आहे.
सुविधा 24/7 उपलब्ध असेल
ही चार्जिंग स्टेशन्स इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना शहरांमध्ये आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जलद आणि सोयीस्कर चार्जिंग पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आलेली आहेत. यापैकी बहुतेक चार्जिग स्टेशन्स हे ग्राहकांसाठी 24/7 उघडे असतील. त्यामुळे ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्यात आलं आहे.
MyHyundai ॲप उपयोगी ठरेल
लांब पल्ल्याच्या प्रवासात असताना ग्राहकांना अनेकदा गाड्यांना चार्ज करावं लागतं. अशा वेळी वेळेवर चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध नसतात. यासाठी ग्राहक चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी, नेव्हिगेट करण्यासाठी, प्री-बुक चार्जिंग स्लॉट्स, डिजिटल पेमेंट करण्यासाठी आणि चार्जिंग स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी MyHyundai ॲप वापरू शकतात. Hyundai 2024 मध्ये 10 किंवा अधिक नवीन ठिकाणी आपले अल्ट्रा-फास्ट चार्जिंग नेटवर्क वाढवण्याची योजना आखली आहे.
या व्यतिरिक्त, तामिळनाडू सरकारबरोबर झालेल्या कराराचा भाग म्हणून Hyundai 2027 पर्यंत 100 चार्जिंग स्टेशन्स स्थापित करणार असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.