औरंगजेब बद्दल तुम्हाला इतका पुळका का?; नामांतराला विरोध करणाऱ्या जलील यांच्यावर मनसेची टीका
MNS On Imtiyaz Jaleel: जलील यांच्या विरोधानंतर मनसेने (MNS) यात उडी घेत, थेट जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.
MNS On Imtiyaz Jaleel: केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे (Aurangabad City) नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' (Chhatrapati Sambhajinagar) करण्याचा निर्णयाला परवानगी दिली आहे. त्यामुळे यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. यावरून आता श्रेयवादासह आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. अशातच या निर्णयाला एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी थेट विरोध केला आहे. तर जलील यांच्या विरोधानंतर मनसेने (MNS) यात उडी घेत, थेट जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. तर त्यांना काही प्रश्न देखील उपस्थित केले आहे. मनसेची जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी याबाबत पत्रकार परिषदेत घेत टीका केली आहे.
यावेळी बोलताना खांबेकर म्हणाले की, काल सायंकाळपासुन छत्रपती संभाजीनगरचे चुकून आलेले खासदार इम्तीयाज जलील हे वारंवार नामांतरास विरोध करीत आहेत. यासाठी त्यांनी आंदोलन करणार, मोठा लढा उभारणा अशी वल्गना केली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर वर त्यांनी Aurangabad is our City, Now wait for our show, strength for Aurangabd, Massive Morcha इत्यादी वाक्यांचा वापर करत, उपसवणारे शब्द वापरले आहेत. या निमित्ताने जलील साहेबांना आम्ही विचारू इच्छीतो की, औरंगजेब बद्दल तुम्हाला इतका पुळका का?, आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज तुमचे राजे नव्हते का? छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे औरंगजेबने क्रुर त्रास दिला तो तुम्हाला मान्य होता का? आजपर्यंत औरंगजेब नाव ठेवलेला एखादा तरी बाप तुम्ही पाहीलात का? असे प्रश्न उपस्थित केले आहे.
तुम्हाला कोणी थांबवले होते?
तर पुढे बोलताना खांबेकर म्हणाले की, तुम्हाला जर इतकंच वाईट वाटत असेल तर तुम्ही त्वरीत राजीनामा देऊन बाजुला व्हावे, राहीला प्रश्न विकासाचा तर आज पत्रकार परीषदेत तुम्ही बोलत होतात, नामांतरानंतर कीत हजार कोटीचे पॅकेज देणार?, पाणी रोज येणार का?, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार का? वगैरे वगैरे.... पण खासदार साहेबांनी एकच उत्तर द्यावे इतके वर्ष औरंगाबाद नाव होते तेव्हा वरील प्रश्न सुटलेत का? तुम्हाला कोणी थांबवले वरील प्रश्न सोडवण्यासाठी, तुम्ही पाण्यासाठी मोर्चे काढा, पॅकेज साठी मोर्चा काढा यासाठी तुम्हाला कुणी अडवले, असा खोचक टोला खांबेकर यांनी लगावला आहे.
तर आम्ही देखील तयार आहोत.
तर जलील यांनी उगीच उचका-उचकीची भाषा करू नये, आमच्या आनंदात मीठ कालवू नये, आम्हाला मुळीच संघर्ष नको आहे. जर तुम्हाला संघर्ष हवा असेल तर आम्ही देखील तयार आहोत. तुमचे आंदोलन झाल्यास आमचे देखील आंदोलन होईल हे आपण कृपया लक्षात घ्यावे., असा इशारा देखील मनसेकडून यावेळी देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Imtiyaz Jaleel: जी 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार; नामांतरावरून जलील यांचा इशारा