खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी सोडलं, आंदोलन सुरु ठेवण्यावर जलील ठाम
औरंगाबादमधील शहागंज मशिद प्रवेशासाठी निघाले असताना खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिलं. मशिदीत जाण्यापासून अडवलं असलं तरी आंदोलन सुरुच राहणार असं जलील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी सोडलं आहे. मंदिर-मशिदीत प्रवेश झाला नाही म्हणजे आंदोलन स्थगित केलं असं नाही. हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी यावेळी म्हटलं. शहागंज मशिद प्रवेशासाठी निघाले असताना इम्तियाज जलील यांना आज दुपारी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस आयुक्तालयात नेण्यात आलं होतं. या मशिदीच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंदिर उघडण्यावरुन जलील आणि खैरे यांच्यात खडाजंगी राज्यातील सर्व मंदिरं उघडा या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली. मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन देणार असल्याचं जलील यांनी जाहीर केलं. यावरुन शिवसेना आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इम्तियाज जलील यांच्या या भूमिकेला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे. "हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?", असा सवाल त्यांनी इम्तियाज जलील यांना विचारला. यानंतर पुजाऱ्यांना निवेदन देण्याचं आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती पोलीस प्रशासनाने केल्यानंतर जलील यांनी आंदोलन रद्द केलं. मात्र शहागंज इथल्या मशिदीत दुपारी नमाज अदा करु अशी घोषणा केल्यानंतर तणाव कायम राहिला.
इम्तियाज जलील आज दुपारी एकच्या सुमारास शहागंज इथल्या मशिदीत प्रवेश करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात नेलं. परिणामी आंदोलन सुरु झालंच नाही. "मशिदीत प्रवेश करुन लोकांना जमवण्याचा माझा उद्देश नव्हता. सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या हा यामागचा उद्देश होता. मंदिर आणि मशिदीत जाण्यापासून आम्हाला थांबवलं याचा अर्थ आमचं आंदोलन मागे घेतलं असा होता. आंदोलन सुरुच राहणार आहे. ही लोकांची भावना आहे. सध्या आम्ही औरंगाबादमध्ये आंदोलन केलं, पण याची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरु करु. हे होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा," अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्यावर प्रतिक्रिया दिली.