औरंगाबादमध्ये डिझेलचा टँकर पलटी, डिझेल भरण्यासाठी शेकडोंची धावपळ; 200 लिटरचा ड्रम घेऊन पठ्ठ्या टँकरकडे!
गावाशेजारीच डिझेलचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय गावकऱ्यांनी टँकरकडे मोर्चा वळवला. कोणी बकेट घेतली, कोणी 200 लिटरचा ड्रम, कोणी पाच लिटरचा कॅन, तर कोणी पंचवीस लिटरचा ड्रम घेऊन टँकरकडे धाव घेतली आणि जमेल तेवढे डिझेल गोळा करायची धावपळ सुरु झाली. औरंगाबादमध्ये ही घटना घडली.
औरंगाबाद : औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ एक डिझेलचा टँकर पलटी झाला. गावाशेजारीच डिझेलचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय गावकऱ्यांनी टँकरकडे मोर्चा वळवला. कोणी बकेट घेतली, कोणी 200 लिटरचा ड्रम, कोणी पाच लिटरचा कॅन, तर कोणी पंचवीस लिटरचा ड्रम घेऊन टँकरकडे धाव घेतली आणि जमेल तेवढे डिझेल गोळा करायची धावपळ सुरु झाली.
सकाळी साधारणपणे साडेसात वाजता मुंबई-नागपूर हायवेवर डिझेलने भरलेला टँकर जालना जिल्ह्याकडे जात होता. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ दुचाकीने टँकरला हुल दिली आणि डिझेलने भरलेला टँकर रस्त्याच्या खाली जात काटेरी झुडपात पलटी झाला. डिझेलचा टँकर पलटी झाल्याची बातमी काही क्षणातच गावभर पसरली. मग काय लहान लेकरं, बाया-माणसं, वयोवृद्धांनी देखील जमेल ते भांडे हातात घेऊन टँकरकडे धाव घेतली. काट्याकुट्यात शंभर-दोनशे माणसं डिझेल जमा करत होती. एखादा पाण्याचा टँकर आल्यानंतर जी लगबग चालते अगदी अशीच लगबग, आरडाओरडा डिझेल जमा करण्यासाठी सुरु होता.
एका पठ्ठ्या तर चक्क दोनशे लिटरचा ड्रम डोक्यावर घेऊन टँकरकडे पोहोचला. एरव्ही त्या काट्यात जाण्याची हिंमत कोणी केली नसती, मात्र 94 रुपये प्रति लिटर मिळणारं डिझेल समोर दिसल्याने कोणताही विचार न करता माणसं टँकरकडे पोहोचली. गावातील लोक जमेल त्या भांड्यांनी डिझेल जमा करत होते. गावातल्या प्रत्येक घराघरामध्ये डिझेल पाहायला मिळेल.
बरं त्यात गाडीचा क्लिनर जखमी झाला होता. ड्रायव्हरलाही थोडासा मार लागला होता, पण त्यांच्याकडे कोणी पाहायला तयार नव्हतं. लोकांना क्लिनरच्या हातातून वाहणारं रक्त दिसलं नाही पण 94 रुपये प्रति लिटर डिझेल दिसलं. या सगळ्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी झाली होती. शेवटी काही काळात पोलीस पोहोचले आणि डिझेल घेऊन जाणाऱ्यांना थांबवलं. पण तोपर्यंत गावातल्या प्रत्येक जण जमेल तेवढं डिझेल घरात घेऊन आले होते. मंडळी डिझेलचा भाव 100 रुपयांपर्यंत पोहोचल्याने हा सगळा प्रकार घडला हे नक्की...