Aurangabad : औरंगाबादच्या नावे वारली वॉलचा विक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
Aurangabad News: शहरासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या 120 तरुणींनी महावीर चौकाजवळील एस. टी. वर्कशॉपची भिंत अवघ्या सहा तासांत रंगवली आहे.
Aurangabad News: यंदाच्या G-20 (G-20) परिषदेचे बहुमान भारताला मिळाले असल्याने, देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये G-20 परिषदेचे विदेशी पाहुणे बैठका घेणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) देखील अशीच बैठक होणार आहे. त्यामुळे या विदेशी पाहुण्यांच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरातील विकासकामांना वेग आला आहे. सोबतच शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. यानिमित्त औरंगाबाद महापालिकेने शुक्रवारी (17 फेब्रुवारी) कमी वेळात सर्वांत लांब वारली पेंटिंग काढत अनोखा विक्रम केला आहे. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याचे ज्युरी मेंबर रेखा सिंग यांनी जाहीर केले. शहरासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या 120 तरुणींनी महावीर चौकाजवळील एस. टी. वर्कशॉपची भिंत अवघ्या सहा तासांत रंगवली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 10 वाजता या उपक्रमास सुरुवात झाली. 120 तरुणी महिलांनी एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉप येथील भिंतीवर सहा तासांत वारली पेंटिंगची चित्रे काढली. या भिंतीचा आकार 3 हजार 200 स्क्वेअर फूट आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पुण्यातील सुमारे 300 ते 400 कलाकारांनी मिळून 2600 स्क्वेअर फिट इतकी लांब वारली पेंटिंगचा विक्रम केला होता. तो मोडून औरंगाबाद पालिकेने सहा तासांचा रेकॉर्ड केला आहे. पालघर येथून सहा तज्ज्ञ महिलाही यात सहभागी झाल्या होत्या अशी माहिती पथक प्रमुख नंदिनी घोडेले यांनी दिली.
महापालिकेसह इकोत्सव आणि व्हेरॉक यांच्या संयुक्त विद्यमाने हा वारली पेंटिंगचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पेंट ब्रश आणि इतर साहित्य, तसेच जेवण आणि चहापाण्याची व्यवस्था केल्याबद्दल उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांचे आभार व्यक्त केले. यावेळी वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, प्रकाश आठवले व इतर कर्मचारी उपस्थित होते.
जी-20 परिषदेच्या नियोजनाबाबत आढावा बैठक
G-20 आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने शहरात W-20 (विमेन्स 20) परिषद होणार आहे. या परिषदेसाठी अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आणि W-20 (विमेन्स 20) परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. G-20 परिषद बैठकीच्या अनुषंगाने विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य समन्वयकांनी आढावा घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad: जी-20 परिषदेच्या नियोजनाबाबत मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी घेतला आढावा