Aurangabad: जी-20 परिषदेच्या नियोजनाबाबत मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी घेतला आढावा
Aurangabad News: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आणि W-20 (विमेन्स 20) परिषदेच्या धरित्री पटनायक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली आहे.
Aurangabad News: G-20 आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने शहरात W-20 (विमेन्स 20) परिषद होणार आहे. या परिषदेसाठी अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान जी-20 परिषदेच्या नियोजनाबाबत मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी आढावा घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आणि W-20 (विमेन्स 20) परिषदेच्या धरित्री पटनायक यांच्या उपस्थितीत औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाबाबत आढावा बैठक झाली आहे.
जी-20 परिषद बैठकीच्या अनुषंगाने विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य समन्वयकांनी आढावा घेतला. नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, प्रत्येकांनी आपआपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी संबंधितांना दिले. तर या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, स्मार्ट सिटीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, उपायुक्त अपर्णा थेटे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, मनपा शहर अभियंता ए.बी. देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहायक संचालक श्रीमती सुनीता आसवले-मुंडे व कोरयोग्राफर विनायक सईद आदी उपस्थित होते.
G20 च्या पार्श्वभूमीवर धरित्री पटनाईक यांची वेरुळ भेट
या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या वेरुळ अभ्यागत केंद्रास भेट दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी अभ्यागत केंद्राची सविस्तर माहिती दिली. G20 परिषदेत येणारे शिष्टमंडळ वेरुळ (Verul) येथे भेट देणार असून या ठिकाणी त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक बाजूची ओळख करून देण्यात येणार आहे. वेरुळ अभ्यागत केंद्रामध्ये असलेल्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
जेवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्था
वूमन 20 च्या मुख्य समन्वयक पटनायक यांनी काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या. त्यानुसार प्रशासनाने तयारी करावी, असेही सांगण्यात आले. शिष्टमंडळासाठी वाहनव्यवस्था, त्यांच्या आरोग्य, सुरक्षेवरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. परिषदेसाठी दीडशे महिलांचे शिष्टमंडळ 26 फेब्रुवारीला शहरात येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत वंदे मातरम् सभागृहात बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारचे सत्र शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहुण्याच्या जेवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad News: औरंगाबादमध्ये पुन्हा 'गॅंगवार'; गुन्हेगार, टवाळखोरांची शहरात वाढली दहशत