Aurangabad: 'गुगल'व्दारे औरंगाबादचा वाहतूक डेटा सार्वजनिक करण्यात येणार; भारतातील पहिले शहर
Aurangabad: देशातील चार शहरांपैकी गुगलद्वारे वाहतूक डेटा सार्वजनिकपणे प्रसिद्ध करण्यात येणारे औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर म्हणून निवडले गेले आहे.
Aurangabad News: औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर ठरले आहे ज्यासाठी गुगलने (Google) एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर (EIE) डेटा प्रकाशित केला आहे. बुधवारी नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात औरंगाबादचा वाहतूक डेटा सार्वजनिकरित्या लाँच करण्यात आला असल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
बुधवारी नवी दिल्ली येथे संजय गुप्ता (कंट्री हेड, गुगल, इंडिया) यांच्या अध्यक्षतेखाली डेटा लॉन्च करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुगलने औरंगाबाद शहरासाठी इनसाइट्स एक्सप्लोरर (EIE) डेटा लाँच केला. यावेळी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे हवामान बदल विभागाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक आदित्य तिवारी यांनी या कार्यक्रमात औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले.
एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर म्हणजे काय?
गुगलकडे एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोरर (EIE) नावाचे एक फिचर आहे, जे शहरांना कार्बन उत्सर्जन स्त्रोतांचे मोजमाप करण्यास, विश्लेषण करण्यास, उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरणे तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होते. भारतामध्ये गुगलचे एन्व्हायर्नमेंटल इनसाइट्स एक्सप्लोर फिचर केवळ बँगलोर, चेन्नई, पुणे आणि औरंगाबादसाठी उपलब्ध आहे. तर या चार शहरांपैकी गुगलद्वारे वाहतूक डेटा सार्वजनिकपणे प्रसिद्ध करण्यात येणारे औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर म्हणून निवडले गेले आहे. हा डेटा शहरांचा हवामान कृती आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
औरंगाबादकरांसाठी अभिमानाचा क्षण
औरंगाबाद महानगपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पर्यावरण आणि समाजाच्या उन्नतीसाठी गुगलच्या सहकार्याने काम करणे हा औरंगाबादकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. गुगलद्वारे डेटा प्रकाशित करण्यात येणारे औरंगाबाद हे भारतातील पहिले शहर झाल्यामुळे औरंगाबाद इतर शहरांसाठी नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहे. EIE डेटा प्रशासन, संशोधक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना रणनीती बनवण्यासाठी, कार्बन उत्सर्जन मोजण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी मदत करेल जेणेकरून कार्बन फूटप्रिंटवर नियंत्रण ठेवता येईल. येणाऱ्या पिढीसाठी पुढील 30 ते 40 वर्षे शाश्वत वातावरण तयार करण्यासाठी हा EIE डेटा उपयुक्त ठरेल, असे पाण्डेय म्हणाले.