Aurangabad News: मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाली नाही; पोलिसांचा मोठा दावा
Aurangabad News: आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नसल्याचा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार (Sunil Lanjewar) यांनी केला आहे.
Aurangabad News: आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या औरंगाबादच्या महालगावातील कार्यक्रमात गोंधळ उडाला असल्याची घटना समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र हे सर्व आरोप औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad Rural Police Force) फेटाळून लावले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नसल्याचा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार (Sunil Lanjewar) यांनी केला आहे.
याबाबत 'एबीपी माझा'शी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची सभा महालगाव येथे झाली. सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु जसा दावा करण्यात आला आहे की, दगडफेक करण्यात आली आहे, तसे काहीही झालेलं नाही. तसेच सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आल्याची कोणतेही घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
याबाबत पुढे बोलताना लांजेवार म्हणाले की, सभेदरम्यान एक दगड फेकल्याचा आरोपात देखील काहीही तथ्य नाही. कारण असे झाले असते तर सभेत गोंधळ उडाला असता. मात्र सभा सुरळीत झाली असून, आदित्य ठाकरे यांचे देखील पूर्ण भाषण झाल्यावर सभा संपली. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही. तसेच पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने त्रुटी झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी जो केला आहे, त्याचीही आम्ही चौकशी करू असेही लांजेवार म्हणाले.
यापूर्वी देखील याच गावात झाला होता राडा...
दरम्यान ज्या महालगावात आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात राडा झाला आहे, त्याच महालगावात यापूर्वी देखील शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले होते. 25 नोव्हेंबर 2022 रोजी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे हे एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या गावात आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखत जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. तसेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन बोरणारे यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. तसेच याचवेळी बोरणारे यांचा देखील शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. आता महालगावात आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं पाहायला मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad News: मोठी बातमी! शिंदे गटातील मंत्र्याचा ताफा महिलांनी अडवला; औरंगाबादेतील घटना