(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: मागून आलेल्या सावेंना कॅबिनेट मंत्रीपद, आमचाही...; शिरसाटांनी पुन्हा बोलून दाखवली खदखद
Aurangabad: मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या शेवटपर्यंत संजय शिरसाट यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या नावाच्या जागी अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली.
Aurangabad News: राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली असली, तरीही इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे आगामी यादीत आपला नंबर लावण्यासाठी इच्छुकांकडून सतत प्रयत्न सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदावरून आपली खदखद व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना, मागून आलेल्या अतुल सावेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असून, आता आमच्याकडेही पहा असे म्हणत शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातून तिघांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या शेवटपर्यंत संजय शिरसाट यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या नावाच्या जागी अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली. त्यामुळे आता शिरसाट वेटिंग लिस्टमध्ये आहेत. मात्र पुढच्या यादीत आपला नंबर निश्चित असल्याचा दावा शिरसाट यांच्याकडून सतत केला जात आहे. तर पहिल्या यादीतून वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चाही पाहायला मिळते. मात्र शिरसाट यांच्याकडून आपण नाराज नसल्याचे सतत सांगितले जाते.
काय म्हणाले शिरसाट...
आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात आज विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शहरातील रोपळेकर हॉस्पिटल ते जवाहरनगर पोलीस स्टेशनपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संजय शिरसाट यांच्यासह कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि संदिपान भुमरे उपस्थित होते. यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केलं आहे. त्यामुळे अतुल सावे यांना ते कधी राजकरणात घेतील असे मला वाटले नव्हते. मात्र अतुल सावे मागून आले काय, राज्यमंत्री झाले काय, कॅबिनेट मंत्रीही झाले काय, सगळचं झालय. अरे आमच्याकडेही पाहत जा जरा, आजकल सिनीअरीटिचं काही राहीलच नाही, असे म्हणत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंवर निशाणा...
यावेळी बोलतांना संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलीय. मी अडीच वर्षीपासून मुख्यमंत्रीची सही पाहिली नाही असं वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उघडपणे आपली नाराजी व्यक्त करणारे शिरसाट हे शिवसेनेचे पहिले आमदार होते. त्यानंतर सुद्धा त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.