Vinayak Mete Death: तीन तारखेलाही मेटेंचा अपघात करण्याचा झाला होता प्रयत्न; ऑडिओ क्लिप व्हायरल
Vinayak Mete Death: आयशर ट्रक पुढेही जात नव्हता आणि आम्हालाही जाऊ देत नव्हता.
Vinayak Mete Death: विनायक मेटे यांच्या अपघाताच्या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तर काहींनी हा घात असल्याचा दावा केला आहे. अशातच एक ऑडिओ क्लिप सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघाताच्या आधी मेटेंच्या पाच-सहा दिवस सोबत असलेले आणि त्यांचे जवळचे समजले जाणारे अण्णासाहेब मायकर यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. ज्यात तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पृष्टी करत नाही.
एका पत्रकाराला फोनवरून बोलतांना यापूर्वी सुद्धा तीन तारखेला शिखरापूर जवळ असाच अपघाताचा प्रयत्न झाला होता असा दावा मायकर यांनी केला आहे. यावेळी बोलतांना मायकर म्हणाले की, शिखरापूर जवळ घडलेला प्रकार विनायक मेटे यांना माहित होता. त्यादिवशी मी स्वतः गाडीत होतो आणि त्यांना थांबा सुद्धा म्हणालो होतो. पुढे एक आयशर गाडी चालत होता आणि मागून एक चारचाकी गाडी होती. आमच्या गाडीला दाबत होती. त्यावेळी त्या गाडीचा फोटो काढता आला असता पण मी काढला नसल्याने अपघात करणारी गाडीच तीच आहे का हे सांगता येणार नाही. मी त्या गाडीचा नंबर मी घेतला होता, असे मायकर म्हणाले.
गाडीला कटही मारला...
आमच्या गाडीच्या मागे असलेल्या चारचाकीमध्ये चार-पाच जण होते आणि ते हात करत होते. आमच्या गाडीच्या पुढे जायचे, कधी मागे यायचे. डाव्या बाजूने नंतर कट मारून एका गल्लीत घुसले. तर आयशर ट्रक पुढेही जात नव्हता आणि आम्हालाही जाऊ देत नव्हता. तसेच आमच्या गाडीला सतत दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. मेटे यांना महत्वाची बैठक असल्याने ते म्हणाले जाऊ दे कुणीतरी दारू पिलेले असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.
दोन-अडीच किलोमीटरपर्यंत पाठलाग...
पुढे आयशर आणि मागे चारचाकी असा खेळ तब्बल दोन-अडीच किलोमीटरपर्यंत सुरु होता. चारचाकीमधील लोकं हात करून गाडी पुढे थांबवा म्हणून सांगत होते. खुद्द मेटे हे सर्व पाहत होते. त्यामुळे चालकाला गाडी दमाने घे, जाऊ दे त्यांना जायचं असेल तर अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या. तर नेमकं हे कार्यकर्ते कोण आहेत आपण पाहू तरी गाडी बाजूला थांबवू असेही मेटे यांना सांगितले होते. पण त्यांनी जाऊ दे म्हंटले. रात्रीचा घडलेला प्रकार मी अनेकांना सांगितला होता, असेही मायकर म्हणाले.