(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease: कृषिमंत्री सत्तारांच्या जिल्ह्यात अवघ्या साडेतीन महिन्यांत लम्पीमुळे एक हजार जनावरांचा बळी
Lumpy Skin Disease: जिल्ह्यात सर्वाधिक 241 जनावरांचा मृत्यूचा आकडा अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील आहे.
Lumpy Skin Disease: लम्पीचा प्रादुर्भाव अजूनही (Lumpy Skin Disease) काही थांबताना दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यात लम्पीने अक्षरशः थैमान घातला असल्याचं आकडेवारीतून समोर आले आहे. कारण लम्पी आजाराने अवघ्या साडेतीन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील1 हजार 11 जनावरांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक 241 जनावरांचा मृत्यूचा आकडा अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यांतही लम्पीचा आजार वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली होती. ज्यात जिल्ह्यातील 5 लाख 38 हजार 572 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. मात्र असे असतानाच लम्पीमुळे मरण पावलेल्या जनावरांची संख्या हजारांपार गेल्याने, लम्पीचा आजार पुन्हा फोफावण्याची भीती पशुपालकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात लम्पीने आत्तापर्यंत 1 हजार 11 जनावरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक प्रादुर्भाव
औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारी पाहिली असता कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात लम्पीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद आणि वैजापूर या तालुक्यांत बाधित जनावरांचे आणि मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. पैठण तालुक्यात बाधित जनावरांची संख्या वाढलेली असली, तरी या आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आलेले आहे.
जिल्ह्यातील लम्पीची आकडेवारी...
तालुका | बाधित जनावरे | मृत्यू |
औरंगाबाद | 1738 | 153 |
फुलंब्री | 1296 | 157 |
सिल्लोड | 2036 | 241 |
सोयगाव | 1237 | 101 |
पैठण | 1031 | 69 |
गंगापूर | 488 | 40 |
कन्नड | 1566 | 169 |
खुलताबाद | 755 | 52 |
वैजापूर | 396 | 29 |
एकूण | 10544 | 1011 |
जनावरांमध्ये लक्षणे...
जनावरांमध्ये चारा खाणे, पाणी पिणे कमी होणे, ताप येणे, डोळे व नाकातून पाणी येणे, अंगावर गाठी येणे आदी लक्षणे दिसून येतात. अंगावर सूज येणे, त्वचा काळी पडणे, अंतर्गत रक्तस्राव आदी लक्षणेही काही जनावरांमध्ये दिसून येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली आहे.