Chandrakant Khaire: सर्व बंडखोर आमदार निवडणूकीत पडले नाही तर मी हिमालयात जाईल: चंद्रकांत खैरे
Aurangabad : फुटून गेलेल्या सर्वच 50 आमदार आगामी निवडणुकीत पराभूत होतील असे खैरे म्हणाले.
Chandrakant Khaire: मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या आधी शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. कालच रोहयो मंत्री यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला असतानाच आज त्यांना खैरे यांनी उत्तर दिले आहे. बंडखोरी करणारे सर्वच आमदार पडणार आहे. फुटून गेलेल्या सर्वच 50 आमदार आगामी निवडणुकीत पराभूत होतील. आजपर्यंतचा इतिहास असून, जे फुटून गेले ते सर्व कधीच निवडून आले नाही. मी त्यांना चॅलेंज देतो ते सर्व पडणार आणि ते पडले नाहीत तर मी हिमालयात जाणार असे खैरे म्हणाले आहे.
पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, भुमरे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसून, बिनबुडाचे आरोप आहे. मला माहित आहे त्यांचे सुरवातीच काय होते, ते कसे मोठे झाले सगळं मला माहित आहे. त्यामुळे त्यांनी असे आरोप करून स्वतः केलेल्या चोऱ्यामोऱ्या उघड होऊ देऊ नयेत. आता जशी 500 एकर जमीन झाली, सात वाईन शॉप घेतल्या, पेट्रोल पंप घेतलं आणि काय-काय घेतलं मला सर्वकाही माहित आहे. त्यामुळे मला उघड करायला लावू नका. माझ्यावर टीका केली तर चालेलं, पण उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा खैरे यांनी दिला.
अन्यथा खबरदार पाहून घेऊ...
पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, दंगली झाल्या त्यावेळी कुठे होते भुमरे, पैठणला हिंदुत्ववासाठी दंगली झाल्या त्यावेळी भुमरे कुठेतरी कोपऱ्यात बसले होते. बबन वाघचौरे यांच्या पाठीमागे फिरणाऱ्या भुमरे यांना मीच शिवसेनेत घेतलं. त्यानंतर त्यांना उपसभापती केलं आणि तेथून त्यांची राजकीय सुरवात झाली. ज्यांनी मोठं केलं त्यांना कधीच विसरू नयेत. फाटकी चप्पल घालून फिरणारे भुमरे सर्वाना माहित आहे. त्यामुळे खबरदार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलाल तर पहा असा इशारा खैरे यांनी दिला.
शिंदेंच्या दसऱ्या मेळाव्यात माणसं आणण्यासाठी 51 कोटींचा खर्च...
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत आरोप करतांना खैरे यांनी 51 कोटी रुपये फक्त माणसं आणण्यासाठी खर्च केले जात असल्याचा आरोप केला आहे. एका बसमध्ये सरासरी 52 सीट असतात, प्रत्येकाचा जेवणाचा खर्च 500 रुपये पकडला तर 26 हजार फक्त जेवणाचा खर्च आहे. गाडीचं भाडे 45 हजार रुपये होणार. इतर चहापाणी खर्च 15 हजार रुपये लागतील. त्यामुळे एका बसचा खर्च 86 हजार रुपये असणार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी लोकांना आणण्यासाठी संपर्ण महाराष्ट्रातील 44 जिल्ह्याचा एकूण खर्च पहिला तर तो 51 कोटी 8 लाख 44 हजार रुपये असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Sandipan Bhumre: 'फक्त मैदानात या दाखवतो', पालकमंत्री होताच भुमरेंचा खैरे-दानवेंवर हल्लाबोल
खोके,वाईन शॉप असल्याने संदिपान भुमरे मस्ती आल्यासारखे वागतायत: खैरेंची खोचक टीका