Aurangabad: शपथविधीनंतर अब्दुल सत्तार, भुमरे हे पहिल्यांदाच मतदारसंघात परतणार; जल्लोषाची तयारी
Aurangabad News: त्यांच्या स्वागतासाठी जल्लोषाची जोरदार तयारी सुरू असून, औरंगाबाद विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
Aurangabad News: शिंदे- फडणवीस सरकारमधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार चार दिवसांपूर्वी पार पडला आहे. या मंत्रिमंडळात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन जणांना संधी मिळाली आहे. त्यामुळे शपथविधीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपापल्या मतदारसंघात परत येत आहे. आज कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे शपथविधीनंतर पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यात परत येत आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जल्लोषाची जोरदार तयारी सुरू असून, औरंगाबाद विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
गेल्यावेळी ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले संदिपान भुमरे आणि राज्यमंत्री राहिलेले अब्दुल सत्तार शपथविधीनंतर पहिल्यांदाच आज आपापल्या मतदारसंघात परतणार आहे. तर 15 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्याच प्रमुख शासकीय ध्वजारोहण भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आज परतणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच यावेळी दोन्ही नेत्यांकडून शक्तिप्रदर्शन सुद्धा केले जाणार आहे.
भुमरे समर्थकांकडून जोरदार तयारी...
पैठण तालुक्याचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे आज दुपारी तीन वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत केले जाणर आहे. त्यानंतर त्यांचा ताफा गारखेडा परिसरातील कार्यालयावर दाखल होईल. कार्यालयात सुद्धा शेकडो कार्यकर्त्यांकडून फटाक्याच्या आतिषबाजीसह भुमरे यांचे स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे.
सत्तार यांच्या स्वागताची तयारी
सिल्लोड मतदारसंघाचे आमदार तथा शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेले अब्दुल सत्तार सुद्धा आज दुपारी तीन वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. शिंदे गटात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तारांची मोठी चर्चा होती. त्यापूर्वी त्यांच्या मुलांवर टीईटी घोटाळ्याचा आरोप सुद्धा झाला होता. अशातच आज पहिल्यांदाच अब्दुल सत्तार औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. औरंगाबाद विमानतळावरून सत्तार हे सिल्लोड येथील आपल्या मुख्य कार्यालयावर दाखल होतील. त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न
शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेले भुमरे आणि सत्तार या दोन्ही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात झालेल्या बंडात सहभाग घेतला होता. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी औरंगाबादमध्ये शिव संवाद यात्रा काढली होती. तर शिंदे सरकामध्ये आता या दोन्ही नेत्यांना मंत्रिपद मिळाले असल्याने, समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या...
कधी काँग्रेस, कधी शिवसेना, तर कधी भाजपमध्ये जाण्याची इच्छा; अब्दुल सत्तारांचा राजकीय इतिहास