Aurangabad: कोल्ह्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील घटना
Aurangabad News: या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Aurangabad News: आई-वडील शेतात कापूस वेचत असताना तीन वर्षांची चिमुकली झाडाखाली खेळत होती. तेव्हा अचानक आलेल्या कोल्ह्याने (Fox Attack) चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात डोक्यासह हाताचा लचका तोडल्याची घटना 1 डिसेंबर रोजी कन्नड तालुक्यातील आडगाव (जे.) शिवारात घडली होती. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी या चिमुकलीचा घाटीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धम्मपरी समाधान सोनवणे (वय 3 वर्षे, रा. आडगाव जे.) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
चिमुकलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मपरीचे आई- वडील हे 1डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता स्वतःच्या शेतात कापूस वेचत होते. तेव्हा धम्मपरी बांधावरील झाडाखाली खेळत होती. त्याचवेळी अचानक आलेल्या कोल्ह्याने तिच्या डोक्याचा मोठा लचका तोडला. या हल्ल्यात तिच्या उजव्या हातालाही चावा घेतला होता. तर कोल्ह्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धम्मपरीवर सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला औरंगाबादच्या शासकीय घाटीत हलविण्यात आले होते. मात्र तिच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यापासून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बालिकेच्या कुटुंबाच्या संपर्कात होते. बालिकेचा घाटीत मृत्यू झाल्याचे कळताच वनपाल सी.एम. महाजन यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यू कशामुळे हे स्पष्ट होणार असल्याचं देखील वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गावात शोकाकुल परिस्थिती...
समाधान सोनवणे हे शेतात कापूस वेचत असतांना त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीवर कोल्ह्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. तर वेळोवेळी तिच्या तब्येतीची विचारपूस गावकऱ्यांकडून केली जात होती. मात्र सोमवारी तिचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला असल्याची बातमी कळताच गावात शोकाकुल परिस्थिती परिस्थिती पाहायाला मिळाली. धम्मपरीच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
तरुणावर बिबट्याचा हल्ला...
दुसऱ्या एका घटनेत सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे रविवारी एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृतदेहाची अवस्था पाहून त्याच्यावर बिबट्याच्या हल्ला (Leopard Attack) झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र गावात सद्या भीतीचे वातावरण आहे.