(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! औरंगाबादेत पार्टी करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू; गावात भीतीचे वातावरण
Leopard Attack in Aurangabad: पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
Leopard Attack in Aurangabad: औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे रविवारी रात्री आठ वाजता एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृतदेहाची अवस्था पाहून या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. रवींद्र काजळे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मयत तरुणाचा चुलत भाऊ दीपक काजळे याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी रवींद्र, त्याचा मोठा भाऊ आणि अन्य एका मित्राने गावाजवळील एका शेतात पार्टी करण्याचं नियोजन केले होते. त्यानुसार संध्याकाळी सात वाजता रवींद्र आपल्या दुचाकीवरून पार्टीसाठी ठरलेल्या शेताकडे जाण्यासाठी निघाला. तर त्यापाठोपाठ त्याचा मोठा भाऊ व त्याचा मित्र देखील शेतात जाणार होते.
राजेंद्रचा मृतदेह आढळला!
रवींद्र शेताकडे गेल्याने त्याचा भाऊ आणि मित्र सुद्धा शेताकडे निघाले असतानाच, गावाजवळील माणकाई रस्त्यावरील खड्ड्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्या दोघांनी तिकडे धाव घेतली. दोघांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो रवींद्र काजळेचा असल्याची ओळख पटली. रवींद्रच्या मानेवर हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत. बिबट्याने रवींद्रवर हल्ला करून त्याला ओढून रस्त्याच्या कडेला सोडले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील पोलिसांनी गावकऱ्यांना केलं आहे. तसेच याप्रकरणी सिल्लोड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
गावात भीतीचे वातावरण...
औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. दरम्यान सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्याच्यावर देखील बिबट्यानेच हल्ला केला असावा असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे रेलगावसह परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच अनेकदा शेताची लाईट रात्रीची असल्याने पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जावे लागते. त्यामुळे अशा परिस्थितीत पिकांना पाणी कसे भरावे अशीही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. तर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करण्याची देखील मागणी गावकरी करत आहेत.