Aurangabad: मुलींच्या मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांकडून मारहाण; गुन्हा मात्र....
Aurangabad Crime News: मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जवाबानुसार गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील गोगाबाबा टेकडीजवळ (Goga Baba Hill) काही तरुणींची छेड काढण्यात येत असल्याने मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला छेड काढणाऱ्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या गुंडांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याच्या जवाबानुसार गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. सचिन मधुकर म्हस्के (वय 32 वर्षे, रा. पेठेनगर निसर्ग कॉलनी) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून औरंगाबाद ग्रामीण पोलिसात कार्यरत आहे.
याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, मस्के हे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात पोलीस नाईक म्हणुन नोकरी करतात. दरम्यान आपल्या घरून पोलीस मुख्यालय येथे हजेरीसाठी जात असतांना गोगा बाबा टेकडीच्या शेजारी तिन मुली त्यांच्याजवळ आल्यात. तसेच आम्हाला तिन चार मुलं मारहाण करत असून, आमची गाडी सुद्धा त्यांच्याजवळ असल्याचं म्हणाल्यात. त्यामुळे मस्के यांनी मदतीसाठी 112 नंबर डायल करण्याचा त्यांना सल्ला दिला. तेवढ्यात मारहाण करणारी मुले सुद्धा तिथे पोहचली.
डोक्यात दगड मारला...
मारहाण करणारी मुले तिथे येताच तु त्या मुलींना डायल 112 ला फोन करायला सांगतो का? व पोलीस बोलावतो का असे म्हणत मारहाण करायला सुरवात केली. यावेळी आपण पोलीस असल्याच मस्के यांनी सांगितले असतांनाही त्यांना मारहाण सुरूच होती. तर यातील एकाने दगड घेवुन डोक्यात मारला. त्यानंतर खालीपाडून त्यांनी मस्के यांना लाथा बुक्याने मारहाण केली. यावेळी मस्के यांनी कशीबशी आपली सुटका करून तेथून पळ काढत बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठलं. याप्रकरणी पोलिसांनी तीन-चार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल केल्याचा आरोप...
मुलींच्या मदतीला गेल्याने टोळक्याने आपल्याला जबर मारहाण करत डोके सिमेंट रोडवर आपटले आहे. तसेच इयर फोन व खिशातील 3 हजार 200 रुपये पळवल्याची माहिती म्हस्के यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी माझ्या जवाबानुसार गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: हटके चोरी! चोरट्यांनी चक्क चालू 'विद्युत डीपी'च नेली चोरून
Aurangabad: 'माझा'ने भोंदूबाबाची बातमी दाखवताच राजकीय मंडळीही आक्रमक; मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
