'तू माझी नाही तर, कुणाचीही होऊ देणार नाही'; एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीचा केला...
Aurangabad: या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिवा साळुंके याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: गेल्या आठवड्यात प्रेमप्रकरणातून विद्यापीठ परिसरात एका तरुणाने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतः आणि तिलाही पेटवून दिल्याची घटना समोर आली होती. ज्यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आता पुन्हा असाच काही प्रकार एकतर्फी प्रेमातून समोर आला आहे. औरंगाबादच्या वाळूज महानगरात एका तरुणाने 'तू माझी नाही तर कोणाचीच नाहीस, मी मरेन आणि तुलाही मारीन, अशी धमकी देऊन एका 17 वर्षीय मुलीची छेड काढत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याप्रकरणी तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवा साळुंके (गट क्रमांक 7 वडगाव कोल्हाटी, वाळूज औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज महानगरात कुटुंबासह राहणारी एक अल्पवयीन मुलगी ही परिसरातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान 24 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराजवळ असताना असताना रात्री 9 वाजच्या सुमारास तिच्या ओळखीचा शिवा साळुंके हा तिच्याजवळ आला. तसेच तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये ये म्हणत, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला नकार देताच, शिवाने तिचा हात पकडून तू माझी नाहीस तर कोणाची नाही असे म्हणत तिचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड सुरू केल्याने मुलीच्या घरातील लोक बाहेर आले. त्यांना पाहून शिवाने तेथून पळ काढला.
पुन्हा मुलीला अडवलं...
दरम्यान या घटनेनंतर परत दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुलगी ही कॉलेजमध्ये निघाली. कॉलेजमध्ये जात असताना पाठीमागून आलेल्या शिवाने तिला रस्त्यात गाठत अडवले. तसेच आज मी मरणार असून, तुलाही मारणार असल्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनी आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिवा साळुंके याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकतर्फी प्रेमातून घडतायत गुन्हे...
गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये याचे अधिक प्रमाण आहे. गेल्यावर्षी औरंगाबादच्या उस्मानपुरा परिसरात एका मुलाने एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात देखील एका मुलीला पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अशावेळी मुलांना समुपदेशनाची गरज असून, ते वेळीच लक्षात आले पाहिजे.
धक्कादायक! गावातील व्यक्तीच्या छेडछाडीला कंटाळून महिलेची आत्महत्या, शेतातील झाडाला गळफास लावून घेतला