Aurangabad Politics: आमदार बंब यांची शरद पवारांवर टीका, औरंगाबादेतील राजकीय वातावरण तापले; राष्ट्रवादीसह ठाकरे गट मैदानात
Maharashtra Politics: आमदार प्रशांत बंब यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Maharashtra Politics: आगामी निवडणुका पाहता औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. तर राजकीय नेत्यांकडून देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. अशात दोन दिवसांपूर्वी गंगापूर सहकार साखर कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्या याच टीकेनंतर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत बंब म्हणाले होते की, बारामतीच्या काकांनी राज्यात भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले असून, त्यांच्या अनुयायींच्या खोटेपणाला आणि त्यांनी पसरवलेल्या अफवांना शेतकरी, सभासद, नागरिक बळी पडत असल्याचं आमदार बंब म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते संतोष माने आणि ठाकरे गटाचे नेते कृष्णा डोणगावकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कोण काय बोलले!
बंब यांच्या टीकेला उत्तर देताना संतोष माने म्हणाले की, गंगापूर साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात आमदार बंब यांनी सतत बारामतीचे काका असे उल्लेख केला. आता याच निवडणुकीत पराभव झाल्यावर देखील त्यांच्याकडून बारामतीचे काका असे उल्लेख करण्यात येत आहे. पण शरद पवार यांचं नाव देखील घेण्याची उंची आमदार बंब यांची नाही. आमदार बंब हे संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम आहेत. त्यांना काय म्हणून ओळखले जाते. त्यांच्यामुळे आम्हाला देखील लाज वाटते. निवडणुकीत मतदारांनी नाकारल्यावर तरी त्यांची अक्कल ठिकाण्यावर आली असेल, असे म्हणत माने यांनी बंब यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान याचवेळी ठाकरे गटाचे नेते कृष्णा डोणगावकर यांनी देखील आमदार बंब यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार बंब यांचा एक हजार नव्हे तर साडेबारा हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला आहे. या पराभवाचे खापर बंब यांच्याकडून शरद पवारांवर फोडत आहे. मग बारामतीचे काका जर एवढे वाईट होते तर, आमदार बंब यांनी 2009 ते 2014 पर्यंत त्याच काकांच्या नेतृत्वाखाली का आणि काय काम करत होते हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कळायला पाहिजे, अशी टीका डोणगावकर यांनी केली आहे. तसेच आमदार बंब यांनी आपला काळा पैसा आपल्या मित्रांच्या नावाने कारखान्यात घातला असल्याचा आरोप देखील डोणगावकर यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: