Farmers suicides : कृषीमंत्री सत्तारांनी मतदारसंघात लक्ष द्यावं, शेतकऱ्यांची मागणी, तीन दिवसात दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या
कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मतदारसंघात दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर आता कृषीमंत्र्यांनी मतदारसंघात लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
Farmers suicides : मागील तीन दिवसात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सोयगाव मतदारसंघात दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicides) केल्याची घटना घडली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या दोन तरुण शेतकऱ्यांनी त्यांचं जीवन संपवलं आहे. दीपक जनार्दन सुस्ते (वय 32) आणि गोपाळ शेणफळ सोनवणे (वय 27) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
कृषीमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं, शेतकऱ्यांची मागणी
नापिकीमुळे नैराश्य आलेल्या दीपक जनार्दन सुस्ते या शेतकऱ्याने रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील जरंडी इथे घडली. या शेतकऱ्यावर उपचार चालू असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. मागच्या तीन दिवसाआधी देखील गोपाळ शेणफळ सोनवणे या शेतकऱ्याने सोयगाव येथील आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेतातून काही उत्पन्न हाती आले नाही, त्यातच खरिपासाठी काढलेले खासगी आणि बँकेच्या कर्जाचे ओझे पेडण्याच्या विवेंचनेतून या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या दोन्ही तरुण शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहे.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं भीषण वास्तव समोर आलं आहे. पाच मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात समोर आलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी ते 25 ऑगस्ट या 237 दिवसांत मराठवाड्यातील एकूण 626 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 237 दिवसांत 170 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
अतिवृष्टीचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका
यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं. याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची हातात आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. काही ठिकाणी पीक वाया गेली आहेत, तर काही ठिकाणी जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: