कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर, औरंगाबादेत गेल्या 2 दिवसात 4 बालकांचा मृत्यू
कोरोना संसर्ग आता लहान मुलांसाठीही घातक ठरत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादेत गेल्या 2 दिवसात 4 बालकांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद : कोरोना विषाणूनं आतापर्यंत प्रौढांनाच त्रास दिला आहे, लहान मुलांना फारसा त्रास होत नाही, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चांना छेद देणारी घटना औरंगाबादेत घडली आहे. औरंगाबादेत गेल्या 2 दिवसात 4 मुलांचा कोरोनानं बळी घेतला आहे. त्यामुळे आपल्या चिमुकल्यांची काजळी घ्या, असे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर
औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरु असून दिवसाला 25 पेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. धक्कादायक म्हणजे यात सर्वच वयोगटाची लोक आहेत. त्यात मंगळवारी तर तब्बल 43 जणांचा बळी गेला. यात एक महिन्याचे बाळ, सहा महिन्यांचे एक बाळ आणि एक 14 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. या मृत्यूमूळं आरोग्य यंत्रणेसमोरही आता नवे आव्हान निर्माण झालं आहे. 29 दिवसांचे बाळ वडील पॉझिटीव्ह असल्यानं पॉझिटीव्ह आले, त्याला हृदयाचाही त्रास होता. अतिगंभीर परिस्थितीत त्याला रुग्णालयात आणण्यात आलं आणि त्याचा बळी गेला.
तर 6 महिन्याच्या मुलीलाही 27 तारखेला गंभीर परिस्थितीत आणण्यात आलं होतं, तीन दिवसात तीचाही बळी गेला. ही दोन्ही बाळं ग्रामीण भागातून आली होती. परिस्थिती गंभीर झाल्यावर दाखल केल्यानं कोरोनानं त्यांचा जीव गेला. त्यामुळं वेळीच लक्ष दिलं नाही तर कोरोना लहानग्यांसाठी सुद्धा घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सगळ्यांच मुलांची तपासणी करावी असे नाही. मात्र, घरात कुणी पॉझिटीव्ह आलं आणि मुलांमध्ये लक्षण दिसली तर त्यांचीही कोरोना तपासणी करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. काही लक्षणांवर खास लक्ष देण्याचीही गरज आहे.
मुख्यमंत्री ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन?
14 वर्षांच्या ज्या मुलाचा मृत्यू झाला तोही 23 तारखेपासून रुग्णालयात दाखल होता. तिन्ही मृत्यूतील साम्य म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर त्यांना दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला झालेलं दुर्लक्ष त्याच्या मृत्यूला कारणी भूत ठरल्याचं सांगितलं गेलंय. त्यामुळं वेळीच लक्ष द्या अन्यथा कोरोना लहानग्यांसाठी सुद्धा घातक आहे हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे.