Aurangabad: मोठी बातमी! औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपासून पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.
Aurangabad Rain News: आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे रब्बीतून काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा असतानाच, आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी रिमझिम तर, काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.
आज सकाळपासूनच औरंगाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. संध्याकाळनंतर मात्र परिस्थिती आणखीनच बदलली. दरम्यान रात्री आठ वाजल्यानंतर जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून, हाती आलेल्या पीकांचं या अवकाळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे.
'या' भागात पाऊस सुरू
- गंगापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाला दुपारी 1 वाजता सुरुवात
- दहेगाव बंगला परिसरात रिमझिम पाऊस सुरू असून,विजेचा कडकडाट पाहायला मिळतोय
- शेंदूरवादा सावखेडा परिसरात देखील गेल्या वीस मिनिटांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे.
- पैठण तालुक्यातील बिडकीन, लोहगाव, सोमपुरी परिसरात देखील गेल्या पंधरा मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
- वाळूज परिसरात देखील रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
- पैठण परिसरात ढगाळ वातावरणाचा जोरदार वारा सुरू आहे.
- दौलताबाद परिसरात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे.
ढोरकीन येथे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसासह पडत आहे. बालानगरसह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. बाजार सावंगी परिसरात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथे देखील पावसाचा जोर वाढला.
IMD GFS च्या मार्गदर्शनानुसार, येत्या 24 तासांत, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये किमान तापमान कमी होण्याची शक्यता आहे. तर 24 ते 26 जानेवारी दरम्यान अरबी समुद्रापासून पश्चिम हिमालयाच्या प्रदेशात जास्त आर्द्रता असलेल्या अॅक्टिव वेस्टर्न डिस्टर्बंस हळूहळू पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. आज पश्चिम हिमालयीन भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यानंतर 24 ते 26 जानेवारी दरम्यान तीव्र होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 24 आणि 25, तर उत्तराखंडमध्ये 25 आणि 26 जानेवारीला मुसळधार बर्फवृष्टी होईल.
IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही. तसेच, पुढील तीन दिवसांत पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही काळ कोणताही बदल होणार नाही.