Aurangabad News : काय सांगता! भरधाव कार थेट दुकानात घुसली; दुकानचालक तरुणाचा मृत्यू
Aurangabad Accident News : औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad) एका विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव कार घुसल्याने दुकानदार तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Aurangabad Accident News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील (Aurangabad District) लासुर स्टेशन येथे एका विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव कार घुसल्याने दुकानदार तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर याच अपघातात आणखी पाच जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. रोहित किशन पवार (वय 20 वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वसू सायगाव येथे ही दुर्घटना घडली आहे.
दुकानात भरधाव कार दुकानात घुसली
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील वसू सायगाव येथे नागपूर-मुंबई महामार्गावर किशन पवार यांचे फरसाणाचे (शेव चिवड्याचे) दुकान आहे. महामार्गावर दुकान असल्याने अनेक वाहनधारक थांबून फरसाण घेत असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांचं दुकान सुरू असतं. दरम्यान, शनिवारी पवार यांचा मुलगा रोहित पवार दुकानात बसला होता. यावेळी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक भरधाव कार (एम एच 12 के जे 1510) थेट त्यांच्या दुकानात घुसली. यामध्ये कारच्या धडकेत दुकानाबाहेर असलेल्या चार दुचाकींचा चुराडा झाला.
दुकानदार तरुणाचा मृत्यू
अचानक धरधाव कार दुकानात घुसल्याने आतमध्ये असलेला रोहित पवार हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे मात्र समोर आलेली नाहीत. या घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस कर्मचारी हनुमंत सातपुते, विनोद पवार, अक्षय साळुंके, बाबा शेख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर शिल्लेगाव पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मृत रोहित पवार याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
सायगाव येथे घडला अपघात
नागपूर-मुंबई महामार्गावर वसू सायगाव येथे असलेल्या पवार यांच्या दुकानात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धरधाव कार घुसली. विशेष म्हणजे दुकानासमोर आणि रस्त्यावर असलेल्या दुचाकींना उडवत ही कार थेट दुकानात घुसली. अचानक झालेले या घटनेने परिसरात धावपळ उडाली. नेमकं काय झालं हे कुणालाच कळत नव्हते. जोरात आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर रस्त्यावरील वाहनधारकांनी देखील गाडी थांबवत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र यात दुकानदार रोहित पवारचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :