(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... म्हणून केजरीवाल तुरुंगात आंबे अन् मिठाई खातात; कोर्टात ED चा गंभीर आरोप
केजरीवाल यांना टाईप 2 डायबेटीज आहे, तरीही ते तुरुंगात बटाटा, आंबे आणि मिठाई खात आहेत.
नवी दिल्ली - देशात लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून आम आदमी पार्टीही (AAP) मैदानात उतरली आहे. मात्र, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्याशिवाय पक्षाला निवडणुकीत प्रचार करावा लागत आहे. राजधानी दिल्लीतील बहुचर्चित दारू घोटाळ्याप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. सध्या ते तिहार येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. या दरम्यान दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ईडीने (ED) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाकडून जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल यांच्याकडून हा खटाटोप केला जात असल्याचेही ईडीने म्हटले.
अरविंद केजरीवाल तुरुंगात मिठाई, आंबे आणि साखर खात आहेत. स्वतःची साखर (suger level) वाढवून जामीन मिळवण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असल्याचे ईडीने न्यायालयात म्हटले आहे. ईडीच्या आरोपानंतर दिल्ली कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे.
केजरीवाल यांना टाईप 2 डायबेटीज आहे, तरीही ते तुरुंगात बटाटा, आंबे आणि मिठाई खात आहेत. केजरीवाल जाणीवपूर्वक गोड पदार्थांचे सेवन करत आहे. कारण, या सेवनामुळे त्यांची साखर (suger level) वाढीस जाऊन, वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन मिळण्यास मदत होईल, असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. केजरीवाल यांना न्यायालयाने घरातील जेवण देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने आम्हाला केजरीवाल यांचा डाएट प्लॅन दिला आहे. त्यामध्ये, केजरीवाल काय-काय खातात याची माहिती आहे. त्यानुसार, आंबे, बटाटे आणि गरजेपेक्षा जास्त मिठाई खात आहेत, असेही ईडीने न्यायालयात सांगितले आहे. त्यावर, न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
आप कार्यकर्त्यांना केजरीवालांचा तुरुंगातून संदेश
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पत्नीमार्फत आपच्या कार्यकर्त्यांसाठी खास संदेश पाठवला आहे. ''तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो. मी आज तुम्हाला मलाच वोट करा असं सांगत नाही. आगामी निवडणुकीत तुम्हाला कोणाला पराभूत करण्यासाठी किंवा विजयी करण्यासाठी आवाहनही करत नाही. मी 140 कोटी देशवासीयांना भारतासाठी सहयोग देण्याची आवाहन करत आहे. नवा भारत बनवण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. भारत महान देश आहे. आपली संस्कृती फार काळ पूर्वीची आहे. तरीही आपल्या देशात लोक अशिक्षित का आहेत? गरिब का आहेत? असा सवाल केजरीवाल यांनी तुरुंगातून पाठवलेल्या संदेशातून केला आहे.
सोनिया गांधींनी घेतली सुनिता यांची भेट
दिल्लीतील महाविकास आघाडीच्या सभेतून काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत निषेध व्यक्त केला होता. दरम्यान, या सभेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांना आधार देत विचारपूस केली. इंडिया आघाडीच्या या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.