अनिल अंबानींच्या कंपनीचा बोलबाला! शेअर तब्बल 2400 टक्क्यांनी वाढला; भविष्यातही गुंतवणूकदार मालामाल होणार?
अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या हिशोबाने या कंपनीने चांगले रिटर्न्स दिले आहेत.
मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देत आहेत. उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Industries) ही कंपनीदेखील यापैकीच एक आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. मंगळवारी (17 सप्टेंबर) या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 7 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सध्या हा शेअर 232.80 रुपयांवर पोहोचला आहे. एकीकडे हा शेअर उड्डाण घेत असताना दुसरीकडे ही कंपनी आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आणखी आर्थिक निधी उभा करण्याच्या प्रयत्नात आहे. याच कारणामुळे हा शेअर गुंतवणूकदारांना भविष्यात चांगले रिटर्न्स देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा शेअर गेल्या साडे चार वर्षांत तब्बल 2400 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांतील लो लेव्हल 308 रुपये आहे. या शेअरचे 52 आठवड्यांचे नीचांकी मूल्य 143.70 रुपये आहे. सोमवारी या कंपनीचा शेअर 215.75 रुपयांवर होता.
19 सप्टेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Reliance Infrastructure) या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक येत्या 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत संभाव्य प्रेफरेन्शीयल शेअर इश्यूच्या प्रक्रियेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र कंपनी या प्रक्रियेच्या माध्यमातून नेमका किती निधी उभारणार आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.
2400 टक्क्यांपेक्षा जास्त शेअरचे मूल्य वाढले
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी अनिल अंबानी यांच्या मालकीची आहे. हा शेअर गेल्या साडे चार वर्षांत तब्बल 2400 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. या कंपनीचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 9.20 रुपयांवर होता. हाच शेअर 17 सप्टेंबर 2024 रोजी 232.80 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा शेअर 145 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर साधारण 32 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या दोन महिन्यांचा विचार करायचा झाल्यास या शेअरमध्ये 23 टक्क्यांची तेजी आली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 9100 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
आयफोन 16 साठी ॲपलची भन्नाट ऑफर! तब्बल 25000 स्वस्त मिळू शकतो फोन; जाणून घ्या नेमकं कसं?
15000 चे थेट झाले 25000 रुपये! बजाज फायनान्सनंतर आता पीएन गाडगीळच्या IPO ची हवा
बिग बिलियन डेज पुन्हा आले! आयफोनपासून ते टीव्हीपर्यंत मोठी सूट मिळणार; जाणून घ्या सविस्तर