(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Umesh Kolhe Case : नवनीत राणा यांचे आरोप खोटे, एनआयएला तपास सोपवला : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह
Umesh Kolhe Case : नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.
Umesh Kolhe Case : नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. अमरावती पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान शेख याला न्यायालयात हजर केले होते. इरफान शेख याला न्यायालयाने 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच दरम्यान हे प्रकरण अमरावती पोलिसांनी एनआयएला सोपवले आहे. याप्रकरणी बोलताना अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह म्हणाल्या की, अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आम्ही सुरुवातीपासून बारकाईने तपास करत होतो. अमरावती शहराची परिस्थिती पाहून आणि सगळे पुरावे हाती आल्यावर आम्ही माहिती दिली, असं त्या म्हणाल्या. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आठ आरोपी अद्यापही फरार
पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह म्हणाल्या की, एनआयएला हा तपास आम्ही सोपवला आहे. या प्रकरणातील सातही आरोपीना एनआयएच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्या म्हणल्या की, या प्रकरणातील आठ आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांच्यावर लावलेल्या आरोपावर त्या म्हणाल्या आहे की, हे आरोप खोटे आहेत. आम्ही सर्व पुरावे मिळाल्या शिवाय माहिती दिली नाही. पोस्ट हटवण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे आतापर्यंत आमच्याकडे फक्त एकच व्यक्तीची फिर्याद आली आहे की, आम्हाला नुपूर शर्मा पोस्ट केल्यामुळे धमकी दिली आहे. आम्ही त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली असून त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन देखील केले.
आरती सिंह पुढे म्हणाल्या की, या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान शेखने इतर आरोपी यांना 10 हजार आणि एक बाईक दिली. हत्या प्रकरणातील आरोपी युसूफ याच्यावर उमेश कोल्हे यांची उधारी होती. त्या म्हणाल्या की, व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडिया माध्यमावर आम्ही लक्ष ठेऊन आहे. धमकीचे फोन आल्यास तक्रार करावी. तपास करण्यात येईल, असं त्या म्हणाल्या.