Amravati Rain : अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार! मुसळधार पाऊसामुळे धामणगाव तालुक्यातील रस्त्यांवर पाणी, जनजीवन विस्कळीत
Amravati News : अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात अनेक भागात 9 तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तालुक्यातील विरुळ रोघे गावात पाणी शिरलं आहे.
Amravati Rain Update : अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार सुरु आहे. धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याला जोरदार पावसाचा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतीचं नुकसान झालं आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील 6 गावे संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात अनेक भागात 9 तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तालुक्यातील विरुळ रोघे गावात पाणी शिरलं आहे. विरूळ गावातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी साचलं आहे. ग्रामपंचायत परिसरही जलमय झाला आहे. गावातील मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याचं चित्र आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरूळ रोघे, दाभाडा गावात मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे.
राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी
राज्यभरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अमरावतीतही पाऊस उसंत घ्यायला तयार नाही. तर वर्धा आणि यवतमाळ परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, वर्धा आणि भंडारा परिसरात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपुरात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी नाही
अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी नाही.
'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. आज मुंबईसह कोकण विभागाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.