(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati News : परतवाड्यातील सापन धरणात होमगार्ड तरुणीसह दोन युवतींचे मृतदेह आढळले
Amravati News : अमरावतीमधल्या सापन धरणात दोन तरुणींचे मृतदेह आढळले. यापैकी एक तरुणी होमहार्ड होती. दोघीही पोलीस भरतीची तयारी करत होत्या
अमरावती : अमरावतीच्या परतवाडा तालुक्यातील सापन धरणात दोन युवतींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सापन धरणावर काल (26 जून) दुपारी एका युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर काही वेळातच दुसरा एका मुलीचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही मुली परतवाडाच्या कांडली येथील असून गायत्री पडोळे आणि हेमलता पाटे अशी त्यांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी यांच्या कुटुंबांनी या दोघी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. गायत्री ही होमगार्ड असून या दोघीही मुली पोलीस भरतीची तयारी करत होत्या अशी माहिती मिळत आहे. धरणाच्या परिसरात या दोन्ही युवतीचे मृतदेह आढळल्याने हा घात की अपघात याचा तपास परतवाडा पोलीस करत आहे.
सापन धरणात काल सायंकाळच्या सुमारास गायत्री पडोळे (कांडली) आणि हेमलता घाटे (मुगलाईपुरा) यांचे मृतदेह आढळून आले. रविवारी सकाळी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही तरुणीच्या नातेवाईकांनी आपल्या मुली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. सायंकाळी सापन धरणामध्ये दोन तरुणीचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी आपल्या मुलींना ओळखून एकच टाहो फोडला. गायत्री पडोळे ही होमगार्ड असून गायत्री आणि हेमलता या दोघीही पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होत्या. पोलीस भरतीसाठी धरणावर जाऊन सराव करत होते. एकीचा मृतदेह धरणाच्या भिंतीवर तर दुसरा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आल्याने संशयाची पाल चुकचुकत आहे. त्यातील एका तरुणीचा चेहरा पाण्यातील मासोळ्यांनी खाऊन टाकल्यामुळे विद्रुप झाला होता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह बाहेर काढला असून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. दोन्ही मुलींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परतवाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हा घात आहे की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.
वाळकी इथल्या तलावात पोहण्याचा नाद दोघांच्या जीवावर बेतला
अमरावती जवळ असलेल्या नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीतील वाळकी येथील धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची दुदैवी घटना रविवारी (26 जून) दुपारच्या सुमारास समोर आली. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेत तपासाला सुरुवात केली. घटनेची माहिती मदत आणि बचाव पथकाला मिळाली. या पथकाने धरणाच्या पात्रात शोधमोहीम सुरु केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार विजय चव्हाण (वय अंदाजे 20-22 वर्षे, रा. नवसारी) आणि अभी कुरळकर (रा. रहाटगाव) असल्याचा अंदाज असून घटनास्थळी मिळालेल्या साहित्यांच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात येत आहे.