Amravati : तीन ट्रॅव्हल्स भरून अमरावतीच्या भाविकांना महाकुंभला नेलं आणि तिथेच सोडून पळ काढला, युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्याचा प्रताप
Amravati : अमरावतीहून प्रयागराजला गेलेल्या भाविकांची तीन दिवस जेवणाची आणि झोपण्याची सोय झाली नाही. त्यामुळे भाविक चांगलेच संतप्त झाल्याचं दिसून आलं.

अमरावती : कुंभमेळ्यासाठी अमरावती जिल्ह्यातील भाविकांना प्रयागराज येथे घेऊन गेलेल्या एका व्यक्तीने त्या सर्वांनाच तिथेच सोडून पळ काढल्याची घटना घडली. सूरज मिश्रा असं त्या व्यक्तीचं नाव असून तो आमदार रवी राणांच्या (Ravi Rana) युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता (Yuva Swabhimani Party) असल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराजमधून येताच भाविकांनी त्याच्याविरोधात अमरावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सूरज मिश्रा याने अमरावतीवरून कुंभमेळासाठी तीन ट्रॅव्हल्स भरून भाविकांना प्रयागराजला नेले होते. पण त्याठिकाणी सूरज मिश्रा हा भाविकांना सोडून पळून गेला असा आरोप अमरावतीच्या केला. त्याच्या भरवशावर गेलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं. त्यामुळे भाविकांनी सूरज मिश्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे भाविकांची तीन दिवस जेवण आणि झोपण्याची व्यवस्थाच झाली नसल्याचं समोर आलं.
तीन दिवस भाविकांची गैरसोय
प्रयागराजमध्ये तीन दिवस जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था झाली नसल्याने भाविक भडकले होते. शनिवारी हे भाविक अमरावतीत दाखल होताच त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठलं. सूरज मिश्रा हा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंद करून घेण्यासाठी पोलिस टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं. त्यामुळेच भाविक अधिक संतप्त झाले.
पोलिस प्रतिसाद देत नसल्याने संतप्त भाविक पोलिस मुख्यालय येथे गृहराज्यमंत्री भोयर यांच्या भेटीला गेले. पण त्या ठिकाणीही त्यांना अडवलं गेलं. अखेर पोलिस उपायुक्तांनी फ्रेजरपुरा पोलिसांना भाविकांची तक्रार नोंदवणून घेण्याचे आदेश दिले.
चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे . घटना घडल्यानंतर 17 तासांनी ही आकडेवारी जाहीर झाली. यातील 25 मृतांची ओळख पटली. या घटनेत तब्बल 60 भाविक जखमी झाले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बॅरिकेट्स तुटल्याने झालेल्या गोंधळात ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापना करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:

























