Amravati News : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर अमरावतीमधील शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट हे शेकडो शिवसैनिकांसह शिंदे गटात सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दर्यापूर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवू असे आश्वासन दिलं.
Amravati Chhatrapati Shivaji Maharaj Statue : अमरावतीमधील दर्यापूर (Daryapur) इथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दर्यापूर इथे शिवरायांचा पुतळा बसवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आता दर्यापूरमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाणार असून राज्य सरकार त्याला निधी देखील उपलब्ध करुन देणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अमरावती शहरात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आणि दर्यापूर या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट (Gopal Patil Arbat) यांनी जानेवारी 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विनापरवाना बसवल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. यावेळी प्रशासनाने दोन्ही ठिकाणचे पुतळे हटवले पण यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर जिल्ह्यातून पहिले शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट हे शेकडो शिवसैनिकांसह शिंदे गटात सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दर्यापूर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल असं आश्वासन दिलं. त्यामुळे आता दर्यापूर येथे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार आणि राज्य सरकार त्याला निधी सुद्धा उपलब्ध करुन देईल असंही मुख्यमंत्री म्हणाल्याचं गोपाल पाटील अरबट यांनी सांगितलं.
दर्यापूर येथील शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्त्वात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. यादरम्यान दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी दर्यापूर इथे तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवू असे आश्वासन दिलं. दर्यापूर शहरातील आणखी जी काही समस्या असेल त्या सुद्धा तातडीने मार्गी लावू, असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
संबंधित बातम्या