Amaran OTT Release: सिंघम अगेन, भुल भुलैय्या 3 ला Box Office वर पाणी पाजल्यानंतर आता OTT गाजवण्यासाठी 'अमरन' सज्ज; कधी, कुठे पाहाल?
Amaran OTT Release Date: शिवकार्तिकेय आणि साई पल्लवी यांचा चित्रपट 'अमरन' स्क्रीनवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या 5 आठवड्यांनंतर OTT वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं मल्टीस्टारर सिंघम अगेन आणि भुल भुलैय्या 3 ला बॉक्स ऑफिसवर पाणी पाजलं आहे.
Amaran OTT Release: शिवकार्तिकेय आणि साई पल्लवी यांचा 'अमरन' चित्रपट पडद्यावर आपली जादू चालवण्यात यशस्वी ठरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानं एका महिन्यातच जगभरात तब्बल 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. एवढंच काय तर, बॉलिवूडची तगडी स्टार कास्ट असलेल्या सिंघम अगेन आणि भूल भुलैय्या 3 वरही हा चित्रपट भारी पडला.
थिएटरमध्ये उत्तम कलेक्शन केल्यानंतर आता 'अमरन' OTT गाजवण्यासाठी 'अमरन' सज्ज झाला आहे. शिवकार्तिकेयचा 'अमरन' हा चित्रपट पुढील महिन्यात OTT वर प्रदर्शित होत आहे. मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर केवळ एका महिन्यातच 'अमरन' ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
View this post on Instagram
'अमरन' कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?
शिवकार्तिकेय आणि साई पल्लवी यांचा गाजलेला चित्रपट 'अमरन' 5 डिसेंबर 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सनं 'अमरन'चं पोस्टर रिलीज केलं असून चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सनं 'अमरन'चं पोस्टर रिलीज करत माहिती दिली आहे की, "तारीख लक्षात ठेवा. त्याचं नाव लक्षात ठेवा. मेजर मुकुंद वरदराजन. 5 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर अमरन तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये पाहा.
'अमरन'चा 300 कोटींचा टप्पा पार
शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी स्टारर 'अमरन' चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी केलं आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन अवघा एक महिना झाला आहे आणि कोईमोईनं दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं बजेट तब्बल 120 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. 'अमरन'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 211.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटानं आतापर्यंत एकूण 323 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'अमरन'ची कहाणी काय?
'अमरन'ची कथा मेजर मुकुंद वरदराजन यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. मेजर मुकुंद वरदराजन यांनी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान देशासाठी बलिदान दिलं. 'अमरन'ची कथा शिव अरूर आणि राहुल सिंह यांच्या 'इंडियाज मोस्ट फिअरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज' या पुस्तकावर आधारित आहे, ज्यामध्ये शहीद मेजर मुकुंद वरदराजन यांच्यावर एक संपूर्ण चॅप्टर आहे. त्याच आधारावर रुपेरी पडद्यावर 'अमरन' साकारण्यात आला आहे.