(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वडिलांसाठी मुलगा मैदानात; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांचे 'तांडे सामू चालो', 48 बंजारा तांड्यांना देणार भेट
Sujat Ambedkar: अकोला जिल्ह्यातील बंजारा मतदारांना समोर ठेवत चार दिवसीय 'तांडे सामू चालो' ('तांड्याकडे चला') ही बंजारा तांड्यांची पदयात्रा सुरु केली आहे.
अकोला : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) म्हटलं की सर्वात आधी चेहरा समोर येतोय तो प्रकाश आंबेडकरांचा. मात्र, अलिकडे वंचितमध्ये आंबेडकरांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी असलेले प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत सुजात अकोल्यात फारसं लक्ष घालत नव्हते. मात्र, ते आता अकोल्यात अधिक सक्रिय झाले आहेत. प्रकाश आंबेडकर 2024 ची लोकसभा निवडणूक अकोल्यातून लढणार आहेत. त्याच अनुषंगाने कालपासून (2 ऑक्टोबर) सुजात यांनी अकोला जिल्ह्यातील बंजारा मतदारांना समोर ठेवत चार दिवसीय 'तांडे सामू चालो' ('तांड्याकडे चला') ही बंजारा तांड्यांची पदयात्रा सुरु केलीय. या चार दिवसांत ते 48 बंजारा तांड्यांना भेटी देत बंजारा बांधवांशी संवाद साधणारेयत. या चारही दिवसांत त्यांचा मुक्कामही बंजारा तांड्यांवर असणारेय.
वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर म्हणाले, बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा आणि प्रश्न समजून घेण्यासाठी ही यात्रा आहे. वंचितचा 'इंडिया' आघाडीत समावेश झाला नाही तर त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. लोकांच्या रागाचा सामना त्यांना करावा लागेल. आमची स्वत:च्या ताकदीवर तयारी सुरू केली आहे. सध्याच निवडणूक लढण्याबद्दल विचार केलेला नाही.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर सक्रिय
सुजात याच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदार संघात निवडणूक लढत आहेत. आता 2024 मध्ये सलग अकराव्यांदा ते अकोल्यातूनच निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात होत असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात सांगली (Sangli News) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. डेंग्यू झाला असतानाही सुजात आंबेडकरानी नियोजित मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती.
सुजात आंबेडकर आगामी काळात निवडणूक लढवणार का?
सुजात आंबेडकर आगामी काळात निवडणूक लढवणार का? या चर्चांना उधाण आले होते. अखेर प्रकाश आंबेडकरांनी यावर उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला. या विषयी उत्तर देताना प्रकश आंबेडकर म्हणाले, सुजात आंबेडकर अकोल्यातून लोकसभा आणि विधानसभेची कोणतीच निवडणूक लढणार नाही.
सामाजिक कार्य हा त्याचा पिंड आहे. निवडणुकीच्या राजकारणात त्याला रस आहे का हे त्यालाच सिद्ध करावं लागेल. अकोल्याबाहेरही त्याच्या मतदारसंघाबद्दल विचार केलेला नाही.
हे ही वाचा :