Sangli News : 'वंचित'कडून कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा; डेंग्यू झाला असतानाही सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात धडकला मोर्चा
शासकीय नोकऱ्यांच्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार बंद करा अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोर जावे लागेल असा इशारा सुजाता आंबेडकर यांनी दिला.
सांगली : राज्यात होत असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात सांगली (Sangli News) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. डेंग्यू झाला असतानाही सुजात आंबेडकरानी नियोजित मोर्चाला उपस्थिती दर्शवली. 'वंचित'चे इंद्रजित घाटे यांनी मोर्चाचे संयोजन केले.
देश विकायला काढला आहे
सांगलीतील विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो बेरोजगार आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी सुजात आंबेडकर यांनी देशातील बेरोजगारी, सरकारची धोरणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाचा कारभार चालवण्याच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदीं ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत किंवा ज्या पद्धतीने कारभार करत आहेत ते पाहता त्यांनी देश विकायला काढला आहे अशी घणाघाती टीका यावेळी सुजात आंबडेकरनी केली.
वंचितकडून सरकारला इशारा
शासन निर्णयानुसार शासकीय नोकऱ्याचे खासगीकरण करून कंपन्यामार्फत नोकर भरती करणारा शासन निर्णय रद्द करावा. शाळा दत्तक योजनेअंतर्गत 62,000 शाळांच्या खासगीकरणाच्या दिशेने जाणारा शासन निर्णय रद्द करावा. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना बंद केलेली जुनी पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करावी. नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,विविध नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या आजपर्यंत रद्द झालेल्या विविध नोकर भरती परीक्षेची फी विद्यार्थ्यांना परत मिळावी तसेच विविध परीक्षेसाठी वर्षभरामध्ये विद्याथ्र्याना एकच की असावी, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोर जावे लागेल
देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना शासकीय नोकऱ्यांच्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार बंद करा अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोर जावे लागेल असा इशारा सुजाता आंबेडकर यांनी यावेळी बोलताना दिला.
राज्य सरकारने गेल्या सहा सप्टेंबरला खासगी कंपन्यांशी संगनमत करून राज्यातील नोकरभरतीचा घातकी निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांचे हे कारस्थान आहे. पंधरा ते वीस टक्के कमिशनवर ही नोकरभरती होत आहे. इंग्रजांप्रमाणेच देशलुटीचे हे कारस्थान आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या नोकरीची संधीच या ठेक्याने कायमची घालवली आहे. भविष्यात हा भस्मासुर वाढतच जाणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या