अकोला राष्ट्रवादीतील वाद नव्या वळणावर! अमोल मिटकरींकडून अकोला जिल्हाध्यक्षांवर पाच कोटींचा मानहानीचा दावा
Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यावर तब्बल पाच कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आलाय. यासंदर्भातील नोटीस आज मिटकरींच्या वकीलांकडून मोहोड यांना बजावण्यात आलीय.
अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय. अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर तब्बल पाच कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आलाय. यासंदर्भातील नोटीस आज मिटकरींच्या वकीलांकडून मोहोड यांना बजावण्यात आलीय. मोहोड यांच्यासह एका वृत्तपत्राला आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विशाल गावंडे यांच्यावरही आमदार मिटकरींनी हा दावा ठोकलाय. दरम्यान, कोणत्याही नोटीसला घाबरत नसल्याचं शिवा मोहोड यांनी म्हटलंय.
शिवा मोहोड आणि विशाल गावंडे यांनी मुर्तिजापूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर 28 ऑगस्ट रोजी मिटकरींवर कमिशनखोरीचे आरोप लावले होते. यानंतर मिटकरींनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले केले होते. यानंतर शिवा मोहोडांनी मिटकरींवर काही महिलांच्या अनुषंगाने गंभीर आरोप केले होते. यानंतर आता आमदार मिटकरींनी थेट मोहोड यांच्यावर अब्रूनुसकानीचा दावा ठोकलाय. तर पुढच्या चार दिवसांत मिटकरींविरोधांतील गंभीर पुरावे सार्वजनिक करणार असल्याचे मोहोड यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने एक व्हिडिओ तयार केला होता. ज्यामध्ये मोहोड यांच्याकडून मिटकरींना "घासलेट चोर" (केरोसिन चोर) असे संबोधले होते आणि खोटे व बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. यासोबतच भ्रष्टाचाराचे आरोप लावत 'घासलेट चोर' असे संबोधले गेले, जे निंदनीय आहे. या आरोपांव्यतिरिक्त विविध बदनामीकारक आरोप देखील केले आहेत. त्यामुळे मिटकरींची प्रतिष्ठा आणि स्थान खराब केले आहे. यामुळे मानसिक छळ आणि यातना सहन कराव्या लागत आहेत. समाजाच्या नजरेत त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरींवर आरोप करणारे शिवा मोहोड आणि अन्य दोघांना नोटीसद्वारे सात दिवसांच्या आत लेखी माफी मागण्याचं आवाहन या नोटीद्वारे करण्यात आले आहे.
या नोटीसची पावती आणि पाच कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे. अन्यथा कायदेशीर कार्यवाही सुरू करून सर्वांवर आयपीसीच्या 499, 500, 501 अंतर्गत खटला चालवला जाईल, असा इशारा नोटीसद्वारे दिलाय. त्यांची बदनामी केल्याप्रकरणी या कायदेशीर सूचनेसाठी दहा हजार शुल्क भरण्यास देखील जबाबदार आहेत, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय.
महत्वाच्या बातम्या