अकोला राष्ट्रवादीतील वाद नव्या वळणावर! मिटकरींवर आरोप केलेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर शिक्षिकेचे गंभीर आरोप
आमदार अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod) यांनी गंभीर आरोप केले. अकोला राष्ट्रवादीतील हा वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे.
Akola NCP War: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod) यांनी गंभीर आरोप केले. अकोला राष्ट्रवादीतील हा वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावर आमदार मिटकरींनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.आता शिवा मोहोड यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील सहायक शिक्षिकेने छळवणुकीचे आरोप केले आहेत. शिक्षिका मीना चव्हाण यांनी आरोप केला आहे की, मोहोड यांनी आदिवासी असल्याने छळवणूक केली. शिक्षिकेच्या तक्रारीनंतर शिवा मोहोड यांच्यावर अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर मुंबई उच्च न्यायालयाने गुन्ह्याला स्थगिती दिल्याची शिवा मोहोड यांनी माहिती दिली आहे.
शिक्षिका मीना चव्हाण यांनी काय केलेत आरोप
शिवा मोहोड यांनी आपण आदिवासी असल्यानं छळवणूक केल्याचा शिक्षिकेचा आरोप.
नोकरी वाचविण्यासाठी मोहोड यांनी पैसे मागितल्याचा शिक्षिकेचा आरोप.
वर्गाबाहेर, शाळेबाहेर उभं करणं, अंगावर धावून जाण्याचे प्रकार शिवा मोहोड यांनी केल्याचा आरोप.
शिक्षिका मिना चव्हाण यांना मागच्या महिन्यात मोहोड यांच्या संस्थेनं शाळेतून बडतर्फ केलंय.
शिवा मोहोड यांच्यापासून आपल्याला आणि कुटूंबाला धोका असल्याची शिक्षिकेची तक्रार.
शिवा मोहोड यांना राजकीय संरक्षण असल्यानं कुठूनच न्याय मिळत नसल्याची महिलेची 'एबीपी माझा'कडे खंत.
शिवा मोहोड यांचं उत्तर
सदर शिक्षिका शाळेत सातत्याने शाळेत गैरहजर असल्यानं तिला संस्थेच्या संचालक मंडळानं बडतर्फ केलं.
सदर शिक्षिकेच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली.
आपण आमदार मिटकरींवर आरोप केल्यानंतरच हे प्रकरण समोर का आलं? हे जुनं प्रकरण आहे.
माझ्या घराकडे माणसं पाठवली जात आहेत. माझ्या गाडीचा पाठलाग होतोय. मात्र, मी शांत बसणार नाहीय.
दहा दिवसांनी जो हे घडवतोय त्याच्याविरूद्धचे पुरावे देणार, असं सांगत त्यांनी नाव न घेता आमदार मिटकरींना परत इशारा दिलाय.
मिटकरींवर जयंत पाटलांसमोर कमिशनखोरीचे आरोप
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षाने थेट कमिशनखोरीचा आरोप केला होता. हा आरोपही चक्क पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला होता. या आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, अखेर याप्रकरणी मौन सोडत आमदार अमोल मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळून लावले होते.
कोण आहेत आरोप करणारे शिवा मोहोड
शिवा मोहोड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. अकोला महापालिकेतील माजी सभागृहनेते होते. कौलखेड आणि तुकारामचौक भागात त्यांची मोठी ताकद आहे. शिवा मोहोड यांच्या पत्नी किरण अवताडे यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या