Akola : बनायचं होतं'आयपीएस', परंतू बनला तोतया 'एनसीबी' अधिकारी...
Akola : तोतया 'एनसीबी' अधिकारी नदीम दिवाण अकोला जिल्ह्यातील दहिहांडा पोलिसांकडून अटकेत, तीन सहकाऱ्यांनाही बेड्या.
Akola Latest News Update : त्याचा रूबाब, त्याचा दरारा पाहून अकोला जिल्ह्यातील चोहोट्टाबाजार गावात चांगलीच खळबळ उडाली होती. गावातील पान टपऱ्यांवाले चळाचळा कापायला लागलेत. मात्र, हा रूबाब अन दरारा काही वेळातच 'खाली' उतरला. कारण, त्याचं बिंग फुटलं होतं. 'एनसीबी' (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो)च्या तोतया अधिकाऱ्यास काल अकोला जिल्ह्यातील दहिहंडा पोलिसांकडून अटक करण्यात आली. नदीम शाह दिवाण असं या भामट्याचं नाव आहे. तो अकोला जिल्ह्यातील चोहोट्टाबाजारचा मूळ रहिवाशी आहे. नदीमसोबत त्याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, नदीमनं 'एनसीबी'चा अधिकारी सांगत चोहोट्टाबाजार परिसरातील पान टपऱ्यांवर कारवाया केल्या असल्याचे समजते. त्यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्याचं बिंग फुटलं.
कसं फुटलं तोतया नदीमचं बिंग? :
नागपुर शाखेतील 'एनसीबी'चा (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) 'ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर' असल्याचे सांगत नदीम शाह दिवाण याने काल अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा बाजार परिसरात पान टपऱ्यांवर कारवाई केल्यात. दरम्यान गेल्या एक महिन्यापासून दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीत हा एनसीबीचा तोतया अधिकारी आपल्या पथकासह फिरत असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस कर्मचारी शेखर कोत्रे, अनिल भांडे यांनी चोहोट्टा बाजार परिसरात त्यांचा शोध घेतला. तेव्हा हे चौघेही तोतया अधिकारी आढळून आलेत. त्यांच्याकडे एक चारचाकी वाहन, त्यावर पिवळा अंबर दिवा लावलेला होता. तसेच या वाहनावर 'भारत सरकार' असे स्टिकर होते. सद्यस्थितीत पोलिसांनी चौघांनी ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याची माहिती मुंबईच्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांना देताच त्यांनीही दहीहांडा पोलिस ठाण्यात भेट त्याची चौकशी सुरू केली आहे. नदीमची चारचाकी गाडीही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली. नदीम सध्या दहिहांडा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान काल नांदेडच्या माजी उपमहापौरांनाही 'ईडी'च्या नावानं बोगस नोटीस पाठविल्याची घटना नांदेडात समोर आली होती.
तोतया अधिकाऱ्यांनी दिली पोलीस चौकीला भेट :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांनी चौहट्टा बाजार परिसरात काही पान टपऱ्यावर प्रतिबंधित गुटखा पकडला होता. त्यानंतर हा गुटखा सुपूर्द नाम्यावर सोडून देण्यात आलं, असं कळते. तसेच चौहट्टा पोलिस चौकीतही या चौघांनी भेटी दिल्या. इथे पोलिसांकडून त्यांना अधिकारी असल्यासारखे वागणूक देण्यात आली असेही समजते. परंतु या चौघांचं बिंग फुटलं.
तोतया नदीम उच्चशिक्षित :
नदीम हा इंजिनियर असलेला तरूण. त्याचं 'एमटेक'पर्यत शिक्षण झालेलं. त्याचं आयपीएस अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. मात्र, ते पूर्ण होऊ शकलं नाही. मग त्यांनी 'एनसीबी'चा अधिकारी असल्याचं सांगत मिरवणं सुरू केलं. पिवळ्या दिव्याची गाडी, सोबत तीन-तीन अधिकारी कर्मचारी असं त्याचा थाट असायचा. त्यानं एनसीबी अधिकारी म्हणून काही ठिकाणी धाडीही मारल्याचं समोर आलं आहे.
बनवाट कागदपत्रे, ओळखपत्र, नकली बंदूक जप्त :
नदीम शाह दिवाण आणि त्याचे तीन साथीदार आसिफ शहा बशीर शहा (वय 35), मोसिम शहा मेहबुब शहा (वय 23), इजाज शहा रहेमान शहा (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे चौघेही एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते. दरम्यान त्यांच्याकड बनवाट कागदपत्रे, ओळखपत्र तसेच नकली बंदूक इतर काही वस्तू आढळून आले आहेत.
तोतया अधिकारी नदीमचं होतं 'आयपीएस' व्हायचं स्वप्न :
अटकेत असलेला नदीम याचं 'एमटेक इंजिनीयर'पर्यत शिक्षण झालेलं आहे, त्याचं आयपीएस अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, मात्र ते पूर्ण होऊ शकलं नाही असं तो पोलिसांना सांगतोय. तसेच उर्वरित तिघेजण बारावीपर्यंत शिकलेले असल्याचं समजते. या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तोतया अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अकोला जिल्ह्यात कित्येक लोकांची फसवणूक केली, याचाही तपास दहीहंडा पोलीसांसह एनसीबी करणार आहेत. दरम्यान या तोतया अधिकाऱ्यांकडून कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता पोलीस ठाण्यात भेट द्यावी. आणि तक्रार नोंदवावी, अस आवाहन ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.