Akola Crime : येथे ओशाळली माणुसकी... अकोल्यात पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर अंध पतीसमोरच अत्याचार
Akola Crime : स स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच लैंगिक अत्याचार करण्यात आला. कोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली आहे.
Akola Crime : अकोल्यात (Akola) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्यात आला. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली आहे. 31 मार्चच्या रात्री ही घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे आपल्या नातेवाईकाकडे जात होते. रात्री बसस्थानकावर उशीर झाल्याने गाडी नसल्याने एका व्यक्तीने त्यांना हेरलं. रेल्वे स्टेशनवर नेतो असं सांगत आरोपी गुलाम रसुल शेख मतीन याने दोन्ही अंध पती-पत्नीला निर्जन स्थळी नेत अंध विवाहितेवर बलात्कार केला. काल या दाम्पत्याने या याप्रकरणी शहरातील सिव्हील लाईन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत रात्रीच आरोपी गुलाम रसुलला अटक केली.
काय झालं 31 मार्चच्या रात्री?
परतवाडा शहरातील एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रसला आपल्या आजीकडे राहत असलेल्या चिमुकलीला भेटायला निघाले होते. हे दोघंही अकोला बसस्थानकावर रात्री आठ वाजता पोहोचले. तेथून ते टॉवर चौकात जवळच असलेल्या जुन्या बसस्थानकावर वाडेगावाची बस पकडण्यासाठी निघाले होते. त्यातच वाडेगावची बस त्या दिवशी नव्हती. तर तिकडे दिग्रसमध्ये पाऊस सुरु असलेल्याने दोघांनी रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला. याचवेळी त्यांनी रेल्वेस्थानकाचा पत्ता आणि रस्ता एका व्यक्तीला विचारला. अन् येथेच त्यांचा घात झाला. गुलाम रसुल नावाच्या या नराधमाने त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडण्याच्या नावाखाली एका निर्जनस्थळी नेलं. तिथे त्याने त्या महिलेच्या अंध पतीचा गळा दाबत त्याला आरडाओरड न करण्याचं बजावलं. अन् त्याने त्या हतबल झालेल्या पतीसमोरच त्या अंध महिलेवर तब्बल तीनवेळा लैंगिक अत्याचार केले. रात्री साडेअकरा वाजता या दोघांनाही त्याने रेल्वे स्थानक परिसरात सोडून दिले अन् त्यानंतर त्याने तेथून पोबारा केला.
'ते' पाच दिवस अंध दाम्पत्याच्या तगमगीचे
ती रात्र या दोघांनीही त्या दिवशी कशीबशी रेल्वे स्थानकावर काढली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळीच दिग्रसला पोहोचले. दोघेही प्रचंड घाबरलेले आणि भेदरलेल्या अवस्थेत होते. त्यांची तगमग 'त्या' अंध महिलेच्या आईने ओळखली. तिने तिला विश्वासात घेतल्यानंतर सारी आपबिती सांगितली. तिच्या आईने त्यांना धीर देत काल 5 एप्रिलला चान्नी पोलीस स्टेशन गाठलं. चान्नी पोलिसांनी घटनास्थळ असलेल्या अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांकडे ही तक्रार वर्ग केली. काल सकाळी सिव्हील लाईन पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर अकोला पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत एका दिवसातच आरोपीला बेड्या ठोकल्या.
... अन् 'त्या' नराधमाला बेड्या ठोकल्या
घटनेचे गांभीर्य पाहता अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्लेंसह सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. बस स्थानक परिसर तसेच जुन्या बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली आणि त्या आधारावर त्याची ओळख पटली. पोलिसांनी अकोल्यातील भगतवाडी परिसरातील सज्जाद हुसेन प्लॉट भागातील 26 वर्षीय गुलाम रसूल शेख मतीन याला अटक केली. आज या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस त्याची कोठडीची मागणी करणार आहेत.
अकोला पोलिसांच्या संवेदनशीलतेचं कौतुक
काल सकाळी या दाम्पत्याने याप्रकरणी तक्रार केली अन् अकोला पोलिसांनी मोठ्या वेगाने प्रकरणाचा तपास सुरु केला. तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपी सापडला. यानंतर तातडीने पावलं उचलत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, शहर पोलीस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिव्हील लाईन पोलीस आणि रामदासपेठ पोलिसांच्या या 'टीम वर्क'चं मोठं कौतुक होत आहे.