(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार, दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न : मुख्यमंत्री
पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं.
CM Eknath Shinde : राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अनेक योजनांना केंद्र सरकारचे आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काकडी इथं आयोजीत केलेल्या 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
एकाच छताखाली नागरिकांना अनेक योजनांचा लाभ
शासन आपल्या दारी या अभियानात अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी 40 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबवली आहे. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये, यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना 3 हजार 982 कोटींचा लाभ देण्यात आला असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
समृध्दी महामार्गामुळे शिर्डी आणि परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरु
राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी आणि परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी घाबरु नये, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहेत. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. 53 वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे. शासनाने 35 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता नव्याने दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. सध्या राज्यात पावसानं ओढ दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नमो शेतकरी सन्मान निधीत आता शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजारांची मदत मिळत आहे. जिल्ह्यात फक्त एक रूपयात 12 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवण्यात आला आहे. राज्यात दुर्दैवाने दुष्काळ आला तर यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. त्यामुळं सरकारची मदत , विम्याची मदत असेल या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत शासन पोहोचविणार असून सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये नगर जिल्ह्याने आघाडी घेतली असून कदाचित अहमदनगर जिल्हा पूर्णपणे सोलर जिल्हा होणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: