Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Ahmednagar News : धार्मिक स्थळाजवळ मद्यविक्री आणि मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत आणि ही दुकाने धार्मिक स्थळापासून विशेष अंतरावर असावेत, अशी मागणी अहमदनगर येथील वारकऱ्यांनी केली आहे.
अहमदनगर : धार्मिक स्थळाजवळ मद्यविक्री आणि मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत आणि ही दुकाने धार्मिक स्थळापासून विशेष अंतरावर असावेत, अशी मागणी अहमदनगर (Ahmednagar News) येथील वारकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील (Nevasa Taluka) संत ज्ञानेश्वर माऊली सृष्टीचे आराखडा सादरीकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून आलेल्या वारकरी संप्रदायातील महाराजांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी धार्मिक स्थळाचे पवित्रा टिकावे, यासाठी ही मागणी करण्यात आली.
राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार : विखे पाटील
दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपण या सूचनेचे स्वागत करतो आणि राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करू असं म्हटलं आहे. तसेच धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हा देखील महत्वाचा विषय आहे. मात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा देखील आमचा प्रयत्न असेल. कारण एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त करून आपल्याला विकास करायचा नाही तर त्यांचा देखील विकास आरखाड्यात कसा समावेश करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.
नेवासा तालुक्यात संत ज्ञानेश्वर माऊली सृष्टी साकारणार
दरम्यान, नेवासा तालुक्यातील पैस खांब मंदिर परिसरात जवळपास 850 कोटी रुपये खर्च करून संत ज्ञानेश्वर माऊली सृष्टी उभारण्यात येत आहे. या माऊली सृष्टीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मापासून ते संजीवन समाधीपर्यंतचा काळ चित्र-शिल्प आणि अत्याधुनिक ऑडीओ-व्हिज्युअल स्वरूपात साकारण्यात येणार आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखडाही तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात कोणत्या सुविधा हव्यात, याची माहिती घेण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी सहकार सभागृहात संत-महंत व महाराज यांची बैठक घेतली. या बैठकीत ज्ञानेश्वर सृष्टीचा आराखडा तयार करणारे विकसक शिल्प अभ्यासक अजय कुलकर्णी यांनी सादरीकरण सादर केले. या ठिकाणी हेमांडपंथी शैलीत मंदिर शिल्प, पसायदानावर आधारीत शिल्प उभे करणार आहोत. 3500 लोकांना एकाच वेळी पारायण करता येईल, असे सभागृह, वास्तू, कुंभ निर्माण करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म ते संजीवन समाधीपर्यंत प्रवास मांडण्याचा प्रयत्न शिल्पसृष्टीतून करण्यात आला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 1300 व्या शतकाप्रमाणे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न असून, मोगरा नावाचे उद्यान उभे करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा