Sujay Vikhe Patil : कांदा निर्यातबंदीवर अमित शाहांची भेट घेणार, भाजप खासदार सुजय विखे पाटलांची माहिती
Sujay Vikhe Patil To Meet Amit Shah : अमित शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी ऐवजी इतर पर्याय सूचवणार असल्याचं भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.
अहमदनगर: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा किंवा त्यामध्ये काही पर्यायी मार्ग काढावा यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार असल्याचं भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी सांगितलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री हे अमित शाह यांच्या भेटीला जाणार असल्याचं ते म्हणाले.
याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे यांनी कांदा प्रश्नी आम्ही लवकरच अमित शहा यांना भेटणार आहोत, हा प्रश्न अमित शहा यांच्या हाती असल्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांची वेळ मागितली आहे अशी माहिती दिली. दिल्लीमध्ये भेट झाल्यानंतर कांदा निर्यातबंदी ऐवजी इतर पर्याय आम्ही सूचवणार असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय. सोबतच जानेवारी महिन्यामध्ये कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय होऊ शकतो किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदीचा निर्णय होऊन शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो अशी अपेक्षा सुजय विखे यांनी व्यक्त केली.
कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून शिर्डीत खबरदारी
शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क सक्ती करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत. याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे यांनी म्हटले की, शिर्डी येथे देशातूनच नाही तर परदेशातून देखील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी या सूचना केल्या असल्याचं त्यांनी म्हटले आहे. सोबतच इतरांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवत असल्यास तातडीने चाचणी करून घेण्याचा सल्ला खासदार विखे यांनी दिला आहे.
निर्यातबंदीमुळे कांद्याच्या भावात घसरण
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं घाऊक भावात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळं किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव घसरले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी घाऊक भावात घसरण झाली. बाजारात कांद्याच्या घाऊक दरात सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात कांद्याच्या भावात आणखी घसरण होऊ शकते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
ही बातमी वाचा: