Shirdi Saibaba Sansthan : तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; 10 हजार भरुन थेट आरतीचा मान, साई भक्तांना कुठल्या सुविधा मिळणार?
Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून ही धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवली जाणार आहे.

Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून ही धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवली जाणार आहे. यामध्ये विशेषतः मोठ्या देणगीदारांना व्हीआयपी आरती व दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे. या नव्या धोरणानुसार, आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे. याआधी ही मर्यादा 25,000 रुपये इतकी होती.
याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, साईबाबांच्या दर्शनासाठी भारतभरातून लाखो साई भक्त येत असतात. साई भक्तांचे दर्शन चांगल्या रीतीने व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी साईबाबा संस्थानने प्रयत्न केलेला आहे. जे साई भक्त इथे देणगी देतात, त्यांची मागणी होती की, देणगी दिल्यानंतरच्या सुविधा साईबाबा संस्थानने निर्माण करावा, त्या अनुषंगाने संस्थानने नवीन 'डोनेशन पॉलिसी' तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कशी आहे डोनेशन पॉलिसी?
- दहा हजार ते पन्नास हजार देणगी देणाऱ्या भाविकांना आरतीचा लाभ मिळणार. पाच सदस्यांसाठी देण्यात येणार सुविधा.
- 50 हजार ते एक लाख देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ तसेच वर्षातून एकदा कुटूंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ.
- 1 लाख ते 10 लाख देणगी देणाऱ्यांना दोन व्हीव्हीआयपी आरत्यांचा लाभ, तसेच वर्षातून एकदा दर्शनाची लाईफटाईम सुविधा.
- 10 लाख ते 15 लाख वर्षातून दोन व्हीव्हीआयपी आरती तसेच वर्षातून एकदा पाच सदस्यांना लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा.
- 50 लाखांच्या पुढे तीन व्हीव्हीआयपी आरती तर वर्षातून दोनदा लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा.
- तसेच पंढरपूरच्या धर्तीवर सामान्य दर्शनरांगेतील सुरूवातीला आलेल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा लाभ.
साईबाबा संस्थानकडे एकूण 514 किलो सोनं
दरम्यान, शिर्डी साई संस्थानकडे असलेल्या सोन्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला येणारे भाविक साईचरणी विविध स्वरूपात दान अर्पण करतात. यामध्ये सोनं, चांदी, मौल्यवान दागिने तसेच रोकड यांचा समावेश असतो. सध्या साईबाबा संस्थानकडे एकूण 514 किलो सोनं असून त्यापैकी सुमारे निम्म्या सोन्याचा दररोजच्या पूजेसाठी वापर केला जातो. यामध्ये साईबाबांचे सिंहासन, मंदिरातील गाभारा, सोन्याचे मुकुट व हार यांचा समावेश आहे. नित्यनियमाने वापरात नसलेले उर्वरित सोनं स्ट्राँग रूममध्ये पूर्णतः सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले आहे. या उर्वरित सोन्यापैकी 155 किलो सोनं वितळवून 1, 2 व 5 ग्रॅम वजनाची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव संस्थानने 2021 मध्ये सादर केला होता. या प्रस्तावास 2023 मध्ये शासनाची परवानगी मिळाल्यानंतर याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सदर याचिका न्यायप्रविष्ट असून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आणखी वाचा





















