Shirdi Sai Baba : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, आता भाविकांना मिळणार थेट समाधीला हात लावून दर्शन
Shirdi Sai Baba : शिर्डीत साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे.
Shirdi Sai Baba : साई भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. शिर्डीत (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साई संस्थानने (Shree Sai Baba Sansthan) घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला हस्त स्पर्श करुन समाधीचं दर्शन घेता येणार आहे. ग्रामस्थ आणि भाविकांच्या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांना मंदिरातील काचा आणि जाळ्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) पार पडलेल्या बैठकीत, समाधीसमोरील काचा आणि जाळी हटवण्यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत.
बैठकीत कोणकोणते निर्णय घेतले?
साई भक्तांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना साई मंदिरातील समाधी पुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, द्वारकामाई मंदिरात आतील बाजूला भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येण्या-जाण्याकरता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिगेट काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे आदीबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
दिवाळीच्या सुट्टीत साई चरणी 18 कोटींचं दान
दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिर्डीच्या साई बाबांच्या (Shirdi Sai Baba) झोळीत कोट्यवधींची दान जमा झालं आहे. 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांत तब्बल 18 कोटी रुपयांचे भरभरुन दान भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केलं आहे. यामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलन यांचा समावेश आहे. साईंच्या दक्षिणापेटीत जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम जमा झाली. तर देणगी काऊंटरवरील हा आकडा साडेसात कोटीपेक्षा जास्त आहे. याशिवाय ऑनलाईन देणगीचा आकडाही दीड कोटीच्या जवळ आहे. चेक किंवा डीडीने तीन कोटी, मनीऑर्डरने सात लाख, डेबिट/क्रेडिट कार्डने 1 कोटी 84 लाख रुपये जमा झाले आहेत.
संबंधित बातमी
Shirdi News : साईचरणी कोट्यवधीचं दान, दिवाळीच्या सुट्ट्यांत भाविकांकडून जवळपास 18 कोटी अर्पण