Ram Shinde : आता मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंचा रोख कुणाकडे?
Ram Shinde : अहिल्यानगरमध्ये राम शिंदेंच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्यावेळी भाजपच्या आमदारांनी मात्र पाठ फिरवल्याचं दिसून आलं. त्यानंतर राम शिंदे यांनी आमदारांना इशारा दिला की काय याची चर्चा आता रंगलीय.
अहिल्यानगर : आपण आता विधानपरिषदेचे सभापती झालो, त्यामुळे पक्षाच्या बैठकीला जाऊ शकत नाही किंवा पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असं अनेकांना वाटतं. पण तसा काही प्रोटोकॉल नसल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. आपल्याला सर्वकाही जमतं त्यामुळे यापुढे मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा असंच असेल असा इशारा राम शिंदे यांनी दिला. राम शिंदे यांनी हा इशारा नेमका कुणाला दिला याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. विधानपरिषदेचे सभापती झाल्यानंतर राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमाला भाजपचे आमदार मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे राम शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांना हा इशारा दिला आहे का अशीही चर्चा रंगली आहे.
आपल्याला सर्वकाही जमतं
राम शिंदे म्हणाले की, "विधानपरिषदेचे सभापती पद मिळाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुणी म्हणतं राम शिंदे यांचं पद हे हायकोर्टासारख आहे. त्यांना आता पक्षाचं काही बोलता येत नसतं. ते मिटींगला येत नसतात, त्यांना तसं काही जमत नाही. पण तसं काही नाही. सभापतीला सर्व काही जमतं. आता तर मी सांगेन तो आदेश आणि मी बोलेन तो कायदा आहे. आपल्याला सर्वकाही जमतं."
राम शिंदेंच्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अनुपस्थित
राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याला त्यांच्याच पक्षातील आमदार आणि मंत्र्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे त्याची राजकीय चर्चा रंगत आहे. शिर्डी येथे होणाऱ्या भाजपच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला सर्व आमदार गेले होते. मात्र राम शिंदे यांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रम असताना सर्वच्या सर्व आमदार अनुपस्थित राहिल्याने पक्षातील मतभेद समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राम शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे या सर्व आमदारांना इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, "राज्यात 42 मंत्री झाले आहेत. कोणाला गाडी आहे तर कोणाला सिक्युरिटी नाही, कोणाला गाडी आणि सिक्युरिटी आहे तर त्यांना ऑफिस नाही. ऑफिस आहे तर राहायला बंगला नाही. कारण राज्यात 42 मंत्री कधीच नव्हते. मात्र मी ज्या दिवशी सभापती झालो त्यादिवशी मला ऑफिस दिलं. 'ज्ञानेश्वरी'सारखा चांगला बंगला मिळाला. मी बंगला मागितला नव्हता. दुसऱ्यांना मात्र बंगला मागूनही मिळाला नाही."
ही बातमी वाचा: