सत्तेत असो- नसो, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार : माजी मंत्री शंकरराव गडाख
Ahmednagar News Update : सत्तेत असो नसो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहणार आहे. नेवासा तालुका देखील सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असा विश्वास माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी व्यक्त केला.
अहमदनगर : "अनेक आमदार येणार आहेत, तुम्हीही या असे गुवाहाटीमधून मलाही फोन आले. त्यावेळी काय निर्णय घ्यावा याची मनात घालमेल सुरू होती. राजकारणात केवळ फायदा तोटा बघून चालत नाही. त्यामुळे आपणही सत्तेत असो नसो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मेळावा घेऊन पुढची दिशा ठरवणार आहे. नेवासा तालुका सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असा विश्वास माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी व्यक्त केला.
शंकरराव गडाख यांनी नेवासा मतदारसंघात आज मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. "असे राजकीय प्रसंग येत असतात. आपण सध्या शिवसेनेत आहोत व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत याचा आनंद असून भविष्यकाळात न्यायालयीन निर्णय आणि राजकीय शांतता निर्माण झाल्यावर पुन्हा संवाद साधून निर्णय घेऊ.
"आपण शिंदे गटासोबत गेलो असतो तर मंत्रीपद मिळालं असतं. मात्र, उद्धव ठाकरे यांना दिलेली साथ कायम रहावी यासाठी आपण शिंदे गटात गेलो नाही. ठाकरे सरकार पडणार असल्याची अगोदरच चर्चा सुरू होती. शिवसेनेचे अनेक आमदार राष्ट्रवादी आणी काँग्रेसमुळे नाराज असल्याचं खूप आधीपासून उद्धव ठाकरे यांना माहीत होतं. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार जातील असं वाटलं नव्हतं. राजकारण बदलत असते. मात्र संघटनेची ताकद आपण कायम ठेवावी असे शंकरराव गडाख म्हणाले.
दरम्यान, शंकरराव गडाख यांनी घेतलेल्या आजच्या या मेळाव्याच्या प्रवेशद्वारावर केवळ शंकरराव गडाख यांचच पोस्टर होतं. परंतु, सभास्थानी एकही फलक नव्हता. यावर गडाख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मी त्यांच्या सोबत असलायचं दाखवून दिल आहे. त्यामुळे फलक हवा किंना नको याला महत्व नाही.
महत्वाच्या बातम्या