मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोला, म्हणाले....
Ajit Pawar : आठ महिन्यानंतरही शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यावरुन विरोधी पक्ष नेते वारंवार टीका करत आहेत.
Ajit Pawar : आठ महिन्यानंतरही शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यावरुन विरोधी पक्ष नेते वारंवार टीका करत आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावरुन पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा विषय आहे. सध्याच्या सरकारमध्ये मोठा पक्ष असल्यामुळे वरिष्ठांना विचारावे लागत असावे. दिल्लीला विचारावे लागत असावे. हे असे आपण अनेक वेळा बघतो... असा टोला अजित पवार यांनी लगावला. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
'राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यामध्ये सत्ताधारी पक्षाला भीती वाटते,' असा घणाघात करत कसबा आणि चिंचवडच्या निवडणुका पाहता या सत्ताधाऱ्यांना जनतेने नाकारला आहे, ही वस्तुस्थिती आहे. राज्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाची झालेली युती ही जनतेला पटलेली नाही,' असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले...
'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केलेली आहे, त्यांचे पक्ष चिन्ह आणि नाव हे दुसऱ्यांना दिले, हे सुद्धा जनतेला आवडलेले नाही,' असं अजित पवार म्हणाले. खेड येथे उद्धव ठाकरे यांची जोरदार सभा झाली आहे.. या सभेला विरोधक राष्ट्रवादीने गर्दी केली, असे म्हणतात, मुळात असे काही नाही, असं अजित पवार म्हणाले. सोबतच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर होत चालली आहे, असा आरोपही अजित पवारांनी केला. 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरकारला एक प्रकारची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते निवडणुका घेत नाही. त्यांना यश मिळेल असे वाटत नाही म्हणून ते निवडणुका पुढे ढकलत असावेत,' असा आरोपही अजित पवारांनी केला.
'राज्यामध्ये कांद्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. या संदर्भात आम्ही दोन्ही सभागृहामध्ये या विषयाचा आवाज उठवलेला आहे. कांद्याच्या प्रश्न संदर्भात सरकारने जे काही उत्तर दिलेलं आहे,' ते योग्य नसल्याचे पवार यांनी म्हटले. अवघे काही रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे, ही सुद्धा बाब चिंतेचे आहे. ज्या पद्धतीने राज्याने केंद्राची मदत घेऊन नाफेडशी मदत घेणे अपेक्षित होते, हा प्रश्न हाताळायला पाहिजे होता, तसे काही झालेलं नाही. अजूनही नाफेडणी कांदा खरेदी केली नाही. आज अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. गहू, हरभरा यासारखी पिके सुद्धा आता या अवकाळी पावसामुळे उध्वस्त झालेली आहे,' असेही अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या होळीमध्ये बेरंग झाला. सत्ताधाऱ्यांनी आज धुळवड खेळली, त्याबाबत अजित पवार म्हणाले की, 'सण उत्सव हे आपापल्या पद्धतीने साजरे करायचे असतात. जी परंपरा आहे, ती स्वत: जपली पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण जो शेतकरी वर्ग अडचणीत आहे, त्याच्याकडे सुद्धा आज पाहिले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वास्तविक पाहता तात्काळ मंत्र्यांनी आणि प्रशासनाने याचे गांभीर्याने लक्ष देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले गेले पाहिजे. तसेच त्यांना दिलासा दिला पाहिजे. मात्र सरकारने हे गांभीर्याने घेतलेले नाही, असं अजित पवारांनी म्हटले.
'शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे, आगामी काळामध्ये आम्ही दीडपट त्यांना भाव देऊ, मदत करू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सगळ्यांना समाधान वाटले. पण दुर्दैवाने तसे काही घडलेले दिसत नाही. उलट देशांमध्ये गॅसचे दर वाढले पेट्रोलचे दर वाढले आहे. महागाई सुद्धा वाढत चाललेले आहे. बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे,' असे पवार म्हणाले.
अजित पवार यांनी नगर येथील आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला येऊन नगरच्या रस्त्या संदर्भामध्ये मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केलेली होती. पाथर्डी या ठिकाणी अजित पवारांना आलेल्या अनुभवाविषयी विचारले असता पवार यांनी मी त्या रस्त्यावर जात असताना 50 टक्के कामे आता सुरू असल्याचे दिसून आलेले आहे. पूर्वी दोन तास नगरला यायला लागायचे, आता एक ते सव्वा तासांमध्ये येत आहोत. कालांतराने हा रस्ता पूर्ण होईल. मात्र अद्याप पर्यंत रस्ता पूर्ण झाला नाही, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. काही कामे सुरू आहेत. काही ठिकाणची कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले
संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण याचा विषय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असतानाच त्यावेळेला घेतला होता असे अजित पवार म्हणाले. औरंगाबाद आणि धाराशीव या दोन शहराचे नामांतरण आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केलं होतं. पण नामांतरणाच्या पुढील गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या हातामध्ये असतात. मात्र, नामांतरण जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे महत्त्वाचे आहे. त्याकडेही सरकारने लक्ष दिलं पाहिजे,' असे हे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 'नामांतराच्या मुद्द्यावरून दोन समाजामध्ये तेढ पसरू नये, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. तसेच यापूर्वीही देशांमध्ये अनेक शहरांचे नामांतरण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनीही बहुतांश शहराला महापुरुषांची नावे दिली आहेत,' असेही अजित पवार यांनी सांगतानाच ते म्हणाले,' लोकशाहीमध्ये काम करताना बहुमताचा आदर करून पुढे जायचं असतं. त्यालाच खरी लोकशाही म्हणतात. पण यामधून धर्मा- धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही,' हेही पाहणे गरजेचे आहे.