Raju Shetti on Devendra Fadnavis: पत्रादेवी गावच्या वेशीवरची देवी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शक्तीपीठ असल्याचे सांगून भाविकांची व जनतेची फसवणूक; राजू शेट्टींची देवीला साकडं घालत टीका
Raju Shetti on Devendra Fadnavis : राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाचे शेवटचे मंदिर असलेल्या पत्रादेवी मंदिरास भेट देवून सावंतवाडी येथील बाधित गावातील ग्रामस्थ ,शेतकरी तसेच पर्यावरण प्रेमींची भेट घेतली.

Raju Shetti on Devendra Fadnavis: शक्तिपीठ महामार्गातील पत्रादेवी ही गावच्या वेशीवरची देवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांदा येथील पत्रादेवी शक्तिपीठ असल्याचे सांगून राज्यातील भाविकांची व जनतेची फसवणूक करून अदानीच्या फायद्यासाठी व 50 हजार कोटी रूपयाचा ढपला पाडायचा असल्याने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला देण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी बांदामधील पत्रादेवीस घातले.
शक्तिपीठ महामार्गाचे शेवटचे मंदिर असलेल्या पत्रादेवी मंदिरास भेट
राजू शेट्टी यांनी 11 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचे शेवटचे मंदिर असलेल्या पत्रादेवी मंदिरास भेट देवून सावंतवाडी येथील बाधित गावातील ग्रामस्थ ,शेतकरी तसेच पर्यावरण प्रेमींची भेट घेतली. पत्रादेवी मंदिर हे एका गावाच्या वेशीवरची देवी आहे. याठिकाणी कोणतेही मोठे मंदिर अथवा शक्तीपीठ नाही. पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग करून पवनार येथील माहूरगड, औंढा नागनाथ , परळी वैजनाथ, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची करवीर निवासनी आई अंबाबाई , जोतिबा ही शक्तिपीठे सध्या अस्तिवात असलेल्या रत्नागिरी -नागपूर महामार्गाने जोडलेली आहेत.
जर देवेंद्र फडणवीस यांना कोकणचा विकास करायचा असल्यास..
कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून 7 महामार्ग आहेत. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे आहेत. 17 वर्षापासून मुंबई -गोवा महामार्ग रखडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग 15 वर्षापासून निधीअभावी रखडला आहे. मग कोकणामध्ये येणारा नवीन शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी ? खरंच जर देवेंद्र फडणवीस यांना कोकणचा विकास करायचा असल्यास वरील गोष्टींना प्राधान्य द्यावे. फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जनतेवर लादला जात आहे. रोजगार हमी योजना , कंत्राटी कामगार, पिकविमा योजना , फळबाग लागवड अनुदान , भात पिकाचे प्रोत्साहन अनुदान, बांधकाम व रस्ते विभागाची प्रलंबित 90 हजार कोटीची बिले यासारख्या गोष्टीत राज्य सरकार आर्थिक आरिष्टात सापडले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना 86 हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करत आहेत.
भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समुहाच्या गौणखनिजासाठी शक्तिपीठ
दुसरीकडे, शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हेतू हा भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समुहाचे गौणखनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून परदेशात निर्यात करायचे असल्यानेच भाविकांचे कारण दाखवून हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला जात असल्याची टीका राजू शेट्टी यांनी शेळप ता. आजरा येथे झालेल्या शक्तिपीठ विरोधी बैठकीत केली. शेळप येथील ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये एकजूट करत एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय घेतला. शेळप गावाची याआधी सर्फनाला प्रकल्पासाठी 350 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. सध्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहेत. अनेक कुटूंबातील तरूण भुमिहीन झाल्याने त्यांना पर्यायी जमीन नसल्याने शेती व्यवसायाचे नवीन संकट उभे राहत आहे.
50 हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीचा खटाटोप
यामुळे शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग होवू न देण्याची ठाम भुमिका घेतली आहे. सध्या या गावाजवळून संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पुर्ण झाला आहे. कोल्हापूरमधून गोव्याला जाण्यासाठी एकुण सात रस्ते असून त्यापैकी 4 राष्ट्रीय महामार्ग व 3 राज्य मार्ग सध्या अस्तित्वात आहेत. मग 8 वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असा सवाल डोंगरी भागातील शेतकरी करू लागले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरती अत्यंत तुरळक वाहतूक आहे. यामुळे राज्य सरकारचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हेतू हा भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समुहाचे गौणखनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून परदेशात निर्यात करायचे आहे. या महामार्गावरून अदानीचे गौणखनिज जाणार व त्याचा भार राज्यातील सामान्य जनतेच्या व वाहनधारकांच्या टोलमधून पुढील 90 वर्षासाठी वसुल केला जाणार आहे. त्याबरोबरच या महामार्गातून 50 हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीचा खटाटोप असल्याने सर्व थरातून विरोध होत असतानाही राज्य सरकार रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याची टिका शेट्टी यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
























