Ahmednagar : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमुळे जनतेसमोर बीआरएसचा नवा पर्याय,अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचाचा विश्वास
Ahmednagar News : आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात BRS पर्याय जनतेला असेल यात शंका नाही.
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी सांगली (Sangali) जिल्ह्यातील अनेक माजी सरपंच उपसरपंच यांनी थेट वाहनाने तेलंगणात (Telangana) जात बीआरएस मध्ये प्रवेश केला. आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातीलही अनेक सरपंच बीआरएसच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी-शिवसेना (Shivsena) असा राजकीय प्रवास केलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी महिनाभरापूर्वी बीआरएसमध्ये प्रवेश केला. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शंभरून अधिक कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.
श्रीरामपूर तालुक्यातील 70 टक्के ग्रामपंचायतींवर आपलं राजकीय वर्चस्व असून 35 हून अधिक सरपंच हे बीआरएसमध्ये (BRS) येणार असल्याचं भानुदास मुरकुटे यांनी स्पष्ट केल आहे. तर पक्षात प्रवेश दिल्यावर पैसे दिले जातात हा अपप्रचार केला जात असल्याचा सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. तेलंगणातील विकास कामे आधी पाहण्यासाठी गेलो, त्यानंतर कार्यकर्त्यांनाही विकासकामे दाखवली. आणि त्यानंतर बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता माझ्या या निर्णयानंतर श्रीरामपूर तालुक्यातील अनेक सरपंच असतील, माजी सरपंच असतील, हे सुद्धा बीआरएसमध्ये येणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील अनेक सरपंच भानुदास मुरकुटे यांच्या निर्णयाबरोबर असून त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत. आम्ही अनेक जण तेलंगाणा राज्यात जाऊन आलो. तिथे सुरू असलेली विकास कामे आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना खूप महत्वाच्या असून तेथील सुरु असलेल्या योजना आपल्याकडे सुरू व्हाव्यात, यासाठी भविष्यात काम करणार असल्याच सरपंचांनी स्पष्ट केलं आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रवादी, शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरू आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती सतत बदलत असताना BRS मुळे एक नवा पर्याय समोर येत आहे. त्यातच ग्रामीण भागातून BRS ला वाढणार समर्थन पाहिलं तर आगामी काळात महाविकास आघाडी व महायुतीच्या विरोधात BRS पर्याय जनतेला असेल यात शंका नाही.
आजी माजी सरपंचाचा बीआरएस प्रवेश
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा BRS पक्षात प्रवेश केला आहे. हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात या गाव पुढाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. यामध्ये 60 आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश असल्याचा BRS पक्षाचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते सचिन सोनटक्के यांनी दावा केला आहे. या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातून तब्बल 60 वाहनांचा ताफा हैद्राबादला शक्तिप्रदर्शनासह रवाना झाला होता. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील आजी-माजी सरपंचांनी शक्तिप्रदर्शन करीत राजकीय प्रवेश केल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
इतर संबंधित बातमी :